उसाच्या रसातील थंडाव्याला महागाईचे चटके | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rasavanti

उसाच्या रसातील थंडाव्याला महागाईचे चटके

मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच ठाणे शहरासह आसपासच्या भागात उष्णतेच्या झळा बसू लागल्या. अंगाची लाही लाही करणाऱ्या उन्हामुळे आलेला थकवा दूर करण्यासाठी सध्या चाकरमान्यांसह नागरिकांची पावले शहरातील रसवंतिगृहांकडे वळत आहेत. उसाच्या रसाची मागणी वाढत असली, तरी वाहतूक खर्चात वाढ झाल्यामुळे येत्या काही दिवसांत उसाच्या रसाचे प्रतिग्लास दरही वाढवण्यात येणार आहेत. ठाण्यातील रसवंतिगृहचालकांकडून याबाबत हालचाली सुरू असून, उन्हात थंडावा मिळवताना खिसा मात्र गरम ठेवावा लागणार आहे.

उसाचा रस हा शरीरासाठी अत्यंत गुणकारी असून उन्हाळ्यात त्याचे सेवन केल्यामुळे आपले शरीर थंड ठेवण्यास मदत होऊन प्रतिकारशक्ती वाढवण्यास गुणकारी ठरते. तसेच रसाला जेव्हा लिंबू आणि मिठाची जोड मिळते तेव्हा तो आणखी चवदार होऊन आपल्या शरीराला त्वरित ऊर्जा मिळते. मार्च महिन्यापासूनच उष्णतेची लाट आल्यामुळे सध्या ठाणे शहरातील तापमान ३६ ते ४० अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवले जाते. तेव्हा दुपारी कामासाठी बाहेर पडणारे चाकरमानी आरोग्यवर्धक आणि खिशाला परवडणाऱ्या उसाच्या रसाला प्राधान्य देतात.

...ही आहेत कारणे

1 सध्या ठाणे शहरातील बहुतांश ठिकाणी उसाचा रस प्रतिग्लास १५ रुपयांपर्यंत मिळतो. मागील दोन वर्षांपासून शहरात हेच दर कायम आहेत.

2 पूर्वी घाऊक बाजारातून रसवंतिगृहचालक एक टन ऊस सहा हजार रुपयांना खरेदी करायचे; मात्र आता महागाई वाढल्यामुळे एक टन उसाची किंमत सात हजार रुपये प्रतिटन इतकी झाली आहे.

3इंधनाचे दर वाढल्याने उसाची ने-आण करण्याकरिता वाहतूक खर्च पूर्वीच्या तुलनेत अधिक वाढला आहे. आदी कारणांमुळे ठाणे शहरातील रसवंती चालक एप्रिल-मे महिन्यात उसाच्या रसाच्या किमती प्रतिग्लास तीन ते पाच रुपयांनी वाढवण्याच्या विचारात आहेत.

उन्हाळा सुरू झाल्यापासून ग्राहकांची गर्दी वाढली आहे. उसाच्या किमती तसेच वाहतूक खर्च वाढल्याने आम्हा व्यावसायिकांनाही महागाईची झळ बसली आहे. एप्रिल-मे महिन्यात रसाचे दर तीन ते पाच रुपयांनी वाढवण्याचा विचार करीत आहोत.

- काळुराम फडतरे, रसवंतिगृह चालक, ठाणे

Web Title: Sugarcane Juice Summer Season Rate Grow

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Mumbai Newssugarcanejuice