मेगाब्लॉकमुळे प्रवाशांची घुसमट

मेगाब्लॉकमुळे प्रवाशांची घुसमट

ठाणे - रविवारचा मेगाब्लॉक प्रवाशांसाठी हालेहाल करणारा ठरला. उशिराने धावणाऱ्या लोकल गाड्या, त्यात अपुऱ्या फेऱ्या, जलद लाईन सुरू असल्याने गर्दीने भरलेला फलाट; यामुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांची रविवारी अक्षरश: घुसमट झाली. लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांसह सर्वच प्रवाशांना रविवारच्या ब्लॉकने हवालदिल केले. नेहमी प्रवाशांच्या गर्दीने सर्व फलाट खचाखच भरलेल्या ठाणे रेल्वेस्थानकात रविवारी मात्र कुठे (धीम्या मार्गावर) शुकशुकाट, तर कुठे (जलद मार्गावर) तुफान गर्दी दिसून आली.

रविवारी ठाणे स्थानकात जलद मार्गावर लोकल येताच ती पकडण्यासाठी प्रवाशांची नुसती धावपळ सुरू असल्याचे दिसून आले. ठाणे, दिवा, डोंबिवली, कल्याण स्थानकातच प्रवाशांची गर्दी होती, इतर स्थानके ओस पडल्याचे चित्र दुपारच्या प्रहरी दिसून आले. ठाणे ते कल्याण डाऊन धीम्या मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ४ व दिवा ते ठाणे अप धीम्या मार्गावर सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत मध्य रेल्वेच्या वतीने कामासाठी मेगाब्लॉक घेण्यात आला होता. दिवा ते ठाणे अप धीम्या मार्गावर ब्लॉक असला तरी कोपर स्थानकातही तासन्‌तास प्रतीक्षा करूनही लोकल काही येताना दिसत नसल्याने प्रवाशांनी डोंबिवली स्थानक गाठत जलद मार्गाने प्रवास केला. एरवी गर्दीने खचाखच भरलेल्या ठाणे स्थानकातही फलाट क्रमांक २, ३, ४ वर शुकशुकाट पाहायला मिळत होता; तर फलाट क्रमांक ५, ६ वर जलद लोकल पकडण्यासाठी प्रवाशांची तुफान गर्दी झाली होती.

मुंब्रा, कळवा स्थानकात दुपारी २ पर्यंत गाडीच नसल्याने प्रवाशांनीही ‘बायरोड’ प्रवास करीत ठाणे स्थानक गाठले. प्रवाशांना आता रविवारच्या मेगाब्लॉकची सवय झाली असल्याने आधीच प्रवासाचा अंदाज घेत दुपारी ४ नंतरच बाहेर पडायचे अनेकांनी ठरवले. अगदीच महत्त्वाचे काम असेल तरच रविवारी बाहेर पडत असल्याचे प्रवाशांनी सांगितले. रविवार सुट्टीचा वार असल्याने अनेकांनी मेगाब्लॉकनंतरच घराबाहेर पडण्यास पसंती दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com