kerala floods: मुंबई, पुणे, ठाणे येथून केरळसाठी मदत 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 ऑगस्ट 2018

पावसाने थैमान घातल्याने केरळमधील जनजीवन पूर्णतः विस्कळित झाले आहे. केरळवासीयांच्या मदतीसाठी ठाण्यातील म्युज संस्थेने मदतीचा हात देऊ केला आहे. तेथील नागरिकांना जीवनावश्‍यक वस्तूंची गरज लक्षात घेत या वस्तू जमा करण्याचे काम संस्थेच्या वतीने पुणे, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली परिसरातील केंद्रांवर सुरू आहे. विमान वाहतूक व नौदल यांच्या मदतीने रविवारी ही मदत केरळकडे रवाना होण्याची शक्‍यता असल्याचे म्युज संस्थेच्या सदस्यांनी सांगितले.

ठाणे : पावसाने थैमान घातल्याने केरळमधील जनजीवन पूर्णतः विस्कळित झाले आहे. केरळवासीयांच्या मदतीसाठी ठाण्यातील म्युज संस्थेने मदतीचा हात देऊ केला आहे. तेथील नागरिकांना जीवनावश्‍यक वस्तूंची गरज लक्षात घेत या वस्तू जमा करण्याचे काम संस्थेच्या वतीने पुणे, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली परिसरातील केंद्रांवर सुरू आहे. विमान वाहतूक व नौदल यांच्या मदतीने रविवारी ही मदत केरळकडे रवाना होण्याची शक्‍यता असल्याचे म्युज संस्थेच्या सदस्यांनी सांगितले.

केरळमधील पूरस्थितीची माहिती प्रसारमाध्यमांमधून प्रसारित होताच केरळसाठी अनेक मदतीचे हात सरसावले आहेत. ठाण्यातील म्युज संस्थेनेही यामध्ये सहभाग घेतला आहे. अनेक नागरिकांना प्रत्यक्षात आपत्कालीनग्रस्त विभागातील रहिवाशांना मदत करावीशी वाटते; परंतु योग्य मार्ग माहिती नसल्याने ती मदत ते पोहोचवू शकत नाही. म्युज संस्था ही मदत पोहोचविण्याचे काम करत आहे. म्युजच्या युवा कार्यकर्त्यांनी ही जबाबदारी पेलली आहे. पुणे, नवी मुंबई, मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवलीत 13 केंद्र म्युजच्या वतीने उभारण्यात आली आहेत. केरळवासीयांसाठी आवश्‍यक वस्तूंची यादी तयार करण्यात आली असून, मदतदात्यांकडून या वस्तू गोळा केल्या जात आहेत. संस्थेकडे मदतीसाठी अनेक नागरिकांनी संपर्क साधण्यास सुरुवात केल्याने मदतकेंद्रे उभारण्याची संकल्पना अमलात आणल्याचे संस्थेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. 

मदतीचा ओघ 
ठाणे शहरात पूर्वेला इंक सॅनिटी टॅटू शॉप, तर पश्‍चिमेला वृंदावन सोसायटी येथे हे मदतकेंद्र उभारण्यात आले आहे. नवी मुंबईतील ऐरोली येथे, कल्याण-डोंबिवली शहरात ही केंद्र उभारण्यात आली आहेत. नागरिकांनी स्वतःची घरे, दुकाने, गाळे सामान ठेवण्यासाठी उपलब्ध करून दिल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. सतत मदतदात्यांचे दूरध्वनी सुरू असून, अनेक जण मदतीची इच्छा व्यक्त करत असल्याचे कार्यकर्ते सांगतात. 

केरळमधील घटना समजल्यानंतर अनेक नागरिकांनी मदत करण्याची अपेक्षा व्यक्त केली. त्यानुसार आम्ही मदतकेंद्र उघडून नागरिकांकडून खाद्यपदार्थ, जीवनावश्‍यक वस्तू, औषध, कॅण्डल, पाणी यांसारख्या वस्तू जमा करीत आहोत. नौदल व विमान वाहतूक सेवा यांच्या आम्ही संपर्कात असून रविवारी ही मदत केरळमध्ये जाण्याची शक्‍यता आहे. - निशांत बंगेरा, म्युज संस्था 

Web Title: Support for Kerala from Mumbai Pune Thane