esakal | Coronavirus: सर्वोच्च न्यायालयाकडून मुंबईचे तोंडभरून कौतुक
sakal

बोलून बातमी शोधा

BMC-Office

Coronavirus: सर्वोच्च न्यायालयाकडून मुंबईचे तोंडभरून कौतुक

sakal_logo
By
समीर सुर्वे

मुंबई: कोविड प्रतिबंधासाठी आणि नियोजनासाठी मुंबई महानगर पालिकेने (BMC) केलेल्या कामाचे सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) कौतुक केले. मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांच्यासोबत चर्चा करुन तेथे काय उपाय करण्यात आले याची माहिती घ्यावी, असे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार (Central Government) आणि दिल्ली सरकारला (Delhi Government) दिला आहे. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनीही मुंबईतील काम उल्लेखनीय असल्याचे नमूद केले. (Supreme Court Praises Mumbai BMC for Coronavirus Preventive Measures)

हेही वाचा: असं झालं तर लसीकरण सुरूच करणार नाही- मुंबई महापालिका

दिल्लीतील हाताबाहेर गेलेल्या कोविड परिस्थितीबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्या. डी. व्हाय. चंद्रचुड यांनी कोविड परिस्थिती हाताळण्यासाठी मुंबई महानगर पालिकेने केलेल्या कामाचे कौतुक केले. मुंबईने कोविड नियंत्रण आणि नियोजनात चांगले काम केले असल्याचे प्रसिध्दी माध्यमांच्यामार्फत समजत आहे. मुंबईने काय केले, हे पाहाणे गरजेचे आहे. यासाठी केंद्रीय आरोग्य सचिव आणि दिल्लीच्या आरोग्य सचिवांनी पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याशी चर्चा करावी. तेथील व्यवस्थेबाबत माहिती घ्यावी, असे निर्देश न्या.चंद्रचुड यांनी दिले. तर, सॉलिसीटर जनरल यांनीही कोविड काळातील मुंबईचे काम उल्लेखनीय असल्याचे नमूद केले. उत्तर भारतात कोविडचा कहर वाढत असताना दुसऱ्या बाजूला मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यातील कोविड संसर्ग नियंत्रणात येत आहे. त्याबद्दल केंद्र सरकारनेही महाराष्ट्र आणि मुंबईचे कौतुक केले आहे.

हेही वाचा: लॉकडाउनमुळे मुंबई लोकलचे १,२७४ कोटींचे नुकसान

नागपूर खंडपिठाने केला उल्लेख

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने मुंबईच्या कंट्रोल रुमचे मॉडेल कोविड औषध, ऑक्सिजन वितरणात वापरण्याबाबत विचार करण्याचा सल्ला यंत्रणांना दिला. पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याशी चर्चा करुन या कंट्रोल रुमचे मॉडेल तयार करावे, असेही खंडपिठाने नमूद केले.