दिशा सॅलियन मृत्यूप्रकरणी सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

सुनिता महामूणकर
Monday, 26 October 2020

अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सैलियनच्या (28) मृत्यूची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी घेण्यास आज सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला.

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सॅलियनच्या (28) मृत्यूची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी घेण्यास आज सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. आधी मुंबई उच्च न्यायालयात याचिका करा, मग सर्वोच्च न्यायालयात या, असे न्यायालयाने याचिकादाराला सुनावले. 

सुशांतच्या मृत्युच्या (ता. 14) सहा दिवस आधी दिशाचा मालाढमधील एका इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. सुशांत आणि दिशाच्या मृत्यूमध्ये सामायिक धागा असून दोन्ही मृत्यु एकमेकांशी निगडित आहेत. त्यामुळे दिशाच्या मृत्यूचीही सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी करणारी याचिका वकील पुनित धांडा यांनी अॅड विनित धांडा यांच्यामार्फत केली आहे. याचिकेवर आज मुख्य न्यायमूर्ती शरद बोबडे, न्यायमूर्ती ए. एस. बोपन्ना आणि न्यायमूर्ती      व्ही . रामसुब्रमण्यम यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. 

मुंबईत हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; टीव्ही मालिकांच्या अभिनेत्रींची सूटका

याचिकादार मुंबई उच्च न्यायालयात का जात नाही.  त्यांना हे प्रकरण माहित आहे आणि ते त्यावर निर्णय घेतील. त्यानंतर तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही सर्वोच्च न्यायालयात येऊ शकता, असे खंडपीठ म्हणाले.  याचिकेत उपस्थित मुद्दे सबळ असतील किंवा नसतील. पण तुम्ही उच्च न्यायालयात याचिका का करत नाही, असा प्रश्न खंडपीठाने उपस्थित केला.  यानंतर याचिका मागे घेण्याची विनंती अॅड. धांडा यांनी खंडपीठाला केली. न्यायालयाने ही विनंती मान्य केली. 
सुशांत आणि दिशा या दोघांच्या मृत्यूबाबतीत संभ्रम आणि संशयाचे वातावरण आहे आणि अनेक अफवा निर्माण होत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने सुशांतच्या आत्महत्येचा तपास सीबीआयकडे वर्ग केला आहे. त्यामुळे दिशाच्या म्रुत्युचा तपासही सीबीआयकडे द्यावा, अशी मागणी न्यायालयाकडे करण्यात आली होती. सुशांतने आत्महत्या केल्याचा अहवाल एम्सच्या वैद्यकीय पथकाने दिला आहे.

मुंबईत सोमवारी मराठा समाजाचा आक्रोश मोर्चा; छत्रपती संभाजीराजे राहणार उपस्थित

 

संपादन - अनिल जमधडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Supreme Court refuses to hear Disha Salian's death case