संजय गांधी उद्यानातील 'यश' वाघावर शस्त्रक्रिया 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

मुंबई : यश या बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात राहणा-या नऊ वर्षाच्या वाघावर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्याच्या तोंडाजवळ अडीच इंचाची गाठ पशुवैद्यकीय अधिकारी व टीमने यशस्वीरित्या काढली. 

मुंबई : यश या बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात राहणा-या नऊ वर्षाच्या वाघावर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्याच्या तोंडाजवळ अडीच इंचाची गाठ पशुवैद्यकीय अधिकारी व टीमने यशस्वीरित्या काढली. 

याबाबत माहिती देताना उद्यानाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ शैलेश पेठे यांनी दिलेल्या माहितीनुसार, यश या राष्ट्रीय उद्यानातील वाघाच्या तोंडाजवळ महिन्याभरापूर्वी गाठ येत असल्याचे आमच्या लक्षात आले. ही गाठ थोडी वाढल्यानंतर तेरा ऑगस्ट रोजी त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया तब्बल दोन तास चालली. हा गाठीचा भाग तपासणीसाठी दिला असता त्यात कर्करोग आढळला नाही, असेही डॉ पेठे म्हणाले. परंतु ही गाठ वाढू दिली असती तर यशला कर्करोग होण्याचा धोका उद्भवला असता. त्यामुळे ही गाठ शस्त्रक्रियेतून काढण्याचा निर्णय आम्ही घेतल्याचे ते म्हणाले. 

शस्त्रक्रियेच्या दोन तासानंतर तो चालूही लागला. त्याला आठवडाभर विश्रांती दिली जाणार असून, त्यानंतर तो सफारीत पर्यटकांना पाहायला मिळेल, अशी माहितीही त्यांनी दिली. 

यशची शस्त्रक्रिया यशस्वी होण्यासाठी पहिल्यांदाच उद्यानात गॅस अनॅस्थेशियाचा वापर करण्यात आला. या प्रक्रियेच्या वापराने प्राणी व्यवस्थित राहतो. पारंपरिक पद्धतीएवजी तोंडात नळीवाटे गॅस अनॅस्थेशिया दिला जातो, असेही डॉ पेठे म्हणाले. सध्या यशला म्हशीचे मटण खायला दिले जात आहे. यशला वैद्यकीय पिंज-यात ठेवले असून, हा पिंजरा सफारीभागापासून लांब असल्याने अजून आठवड्याभराने तो सफारीत पाहायला मिळेल.

Web Title: Surgery on Yash tiger of Sanjay Gandhi Park