
नवी मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या 'माझे कुटुंब - माझी जबाबदारी' या राज्यव्यापी मोहिमेला नवी मुंबईत चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मोहीम सुरू केल्यापासून अवघ्या पाच दिवसांत महापालिकेच्या विविध पथकांनी तब्बल 11 हजार घरांना भेट देऊन सर्व्हे केला आहे. 15 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या या मोहिमेला तब्बल 15 लाख लोकसंख्येच्या सर्वेक्षणाचे आव्हान आहे.
महापालिकेतर्फे या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी 720 पथके तयार केली आहेत. एका पथकात दोन ते तीन कोरोनादूत घरोघरी जाऊन त्यांच्याकडे असणाऱ्या सयंत्रांद्वारे कुटुंबातील सदस्यांचे शारीरिक तापमान व ऑक्सिजनची पातळी मोजत आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्यस्थितीची माहिती सरकारने दिलेल्या ॲपवर नोंदणी करून घेत आहेत. त्यानंतर सर्वेक्षण झालेल्या घरावर स्टिकर लावले जात आहे.
पहिल्या टप्प्यात 15 सप्टेंबरपासून या मोहिमेला सुरुवात झाली आहे. ही मोहीम 10 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. मोहिमेच्या सुरुवातीलाच पालिकेच्या पथकांनी विविध नोडमध्ये जाऊन 5 हजारांहून अधिक घरांना भेटी देत त्यांची आरोग्य तपासणी करून माहिती संकलित केली आहे. या सर्वेक्षणामुळे सहव्याधी (कोमॉर्बिड) असणाऱ्या किंवा इतर नागरिकांना कोरोनाची लागण झाल्यास वेळेत योग्य उपचार उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे. तसेच मृत्यूचे प्रमाण कमी होण्यासही मदत होणार आहे.
कोरोनाविषयक योग्य माहिती देणे
व्यक्तीची आरोग्यविषयक माहिती घेण्यासोबत या पथकामार्फत प्रत्येकाला नियमित मास्क लावणे, वारंवार हात धुणे, सॅनिटायझर वापरणे, आजार न लपवता आवश्यकता भासल्यास फिव्हर क्लिनिकमध्ये जाऊन तपासणी करणे, काही सहव्याधी (कोमॉर्बिडिटी) असल्यास नियमित औषधोपचार घेणे, प्लाझ्मा दान अशी विविध प्रकारची कोरोनाविषयक माहिती दिली जात आहे.
संकलित केली जाणारी माहिती
घरातील एखाद्या व्यक्तीला ताप, खोकला, घशात खवखवणे, थकवा, श्वास घेण्यास त्रास अशा प्रकारचा त्रास होत आहे काय? याची माहिती घेतली जात आहे. तसेच मधुमेह, हृदयरोग, कर्करोग, किडनीचे आजार, अवयव प्रत्यारोपण, दमा अशा सहव्याधी (को-मॉर्बिडिटी) आहेत काय, या संबंधीही माहिती संकलित केली जात आहे.
14 ऑक्टोबरपासून दुसरा टप्पा
10 ऑक्टोबरला पहिला टप्पा संपल्यानंतर 14 ऑक्टोबरपासून सर्वेक्षणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. 14 ऑक्टोबरपासून हे सर्वेक्षण 23 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. या दरम्यान होणाऱ्या सर्वेक्षणात पुन्हा सर्व घरांना भेटी देऊन दुसऱ्यांदा सर्वांचे शारीरिक तापमान आणि ऑक्सिजन सॅच्युरेशन मोजणी करण्यात येणार आहे.
33 रुग्णांना पाठवले नागरी आरोग्य केंद्रात
या सर्वेक्षणातून संकलित होणाऱ्या माहितीच्या आधारे लक्षणे आढळणाऱ्या नागरिकांना त्याच्या तीव्रतेनुसार लगेच वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिले जात आहे. सर्वेक्षणादरम्यान ताप, थंडी आणि सर्दीचा त्रास असणाऱ्या 33 रुग्णांना तत्काळ नागरी आरोग्य केंद्रात उपचार आणि चाचण्यांसाठी पाठवले आहे.
---------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.