ड्रग्ज प्रकरणी रियाने बॉलीवूडमधील 25 जणांची घेतली नावे

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 8 September 2020

रियाची अटक ही सुशांतच्या मृत्यू प्रकरणात नाही तर ड्रग्ज प्रकरणी झाली आहे. एनसीबी सुशांतच्या प्रकरणात ड्रग्जच्या संदर्भात तपास करत आहे.

मुंबई - बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात एनसीबीने कारवाई करताना रिया चक्रवर्तीला अटक केली आहे. सुशांतच्या मृत्यू प्रकरणी रिया मुख्य आरोपी असून तिला नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोनं 8 (C), 27 (A), 29, 20 (B) आणि 28 या कलमांतर्गत अटक केली आहे. बुधवारी तिला न्यायालयासमोर हजर केलं जाईल. मात्र रियाची अटक ही सुशांतच्या मृत्यू प्रकरणात नाही तर ड्रग्ज प्रकरणी झाली आहे. एनसीबी सुशांतच्या प्रकरणात ड्रग्जच्या संदर्भात तपास करत आहे. 

दरम्यान, ड्रग्ज प्रकरणी ताब्यात घेतल्यानंतर रियाची वैद्यकीय तपासणी कऱण्यात येणार आहे. सायन रुग्णालयात तिची वैद्यकीय तपासणी होणार आहे. तिची कोरोना चाचणीसुद्धा करण्यात येईल. एनसीबीने रियाला तिने दिलेल्या जबाबानंतर अटक केली आहे. यामध्ये तिने मान्य केलं आहे की, ड्रग्ज पुरवण्यासाठी तिने मदत केली होती. एवढंच नाही तर ड्रग्ज पेडलर्सशी ती संपर्कात होती असंही तिने मान्य केलं आहे. यानंतर रियाला 67, एनडीपीएस अॅक्‍ट अंतर्गत अटक केली आहे.

हे वाचा -ड्रग्सप्रकरणी NCB ची मोठी कारवाई, अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक

आतापर्यंत रियावर कऱण्यात आलेल्या आरोपांना तिने फेटाळून लावलं होतं. अखेर तपासाच्या तिसऱ्या दिवशी तिने ड्रग्ज प्रकरणातील आरोप मान्य केले. त्यामध्ये ड्रग्ज पुरवण्यासाठी मदत केल्याचं सांगत सुशांतच्या ड्रग्ज पार्टीत सहभागी असल्याचंही मान्य केलं. तसंच सुशांतने ड्रग्ज घेण्यास जबरदस्ती केल्याचंही तिने सांगितलं. तसंच आपण नक्की सांगू शकणार नाही पण मारिजुआनाचं सेवन केल्याची शक्यता आहे असंही ती म्हणाली. 

रियाची गेल्या दोन दिवसात चौकशी करताना तिने आरोप मान्य करण्यास नकार दिला होता. तिसऱ्या दिवशी मात्र तिने अजाणतेपणे ड्रग्ज घेतल्याचं मान्य केलं. तसंच चौकशीत तिने बॉलीवूडमधील 25 मोठ्या नावांचा खुलासाही केल्याची माहिती समजते. रियाला सुशांतसोबत ड्रग्ज पार्टीत कोण कोण होतं असं विचारण्यात आलं होतं. याची माहिती देताना तिने बॉलीवूडमधील 25 बड्या व्यक्तींची नावे सांगितली असल्याचं समजतं. आता एनसीबी पुरावे गोळा केल्यानंतर त्या सर्वांना समन्स पाठवण्याची शक्यता आहे. 

हे वाचा - रियाने सुशांतच्या बहिणीविरोधात मुंबई पोलिसात दाखल केली तक्रार

ड्रग्ज प्रकऱणात रियाला अटक केल्यानंतर बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी म्हटलं की, रिया चक्रवर्तीचं पितळ उघडं पडलं आहे. तिचं ड्रग्ज पेडलर्सशी कनेक्शन होतं हे समोरं आलं. यासाठी तिला अटकही केली आहे. एनसीबीने रियाविरुद्ध पुरावेसुद्धा गोळा केले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sushant singh rajput death case rhea chakraborty arrest by ncb in drugs case