सुशांतनं मृत्यूआधी संपवला होता गांजाच्या सिगारेटचा बॉक्स

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 23 August 2020

सुशांतच्या घरी काम करणाऱ्या नीरज सिंहने धक्कादायक अशी माहिती दिली आहे. सुशांत अमली पदार्थ सेवन करायचा असं नीरजने म्हटलं आहे. 

मुंबई - अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. याच्या तपासात आता नवनवीन खुलासे होते आहेत. सुशांतच्या घरी काम करणाऱ्या नीरज सिंहने धक्कादायक अशी माहिती दिली आहे. सुशांतला अमली पदार्थ सेवन करण्याचं व्यसन होतं असं नीरजने म्हटलं आहे. नीरजने मुंबई पोलिसांना दिलेल्या जबाबात ही माहिती दिली. सुशांतच्या मृत्यूच्या आधी नीरजने गांजाचे रोल तयार करून दिले होते. ज्या दिवशी सुशांतचा मृत्यू झाला त्यादिवशी रोल ठेवलेला बॉक्स रिकामा सापडला होता असं नीरजनं पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटलं असल्याचं वृत्त आज तकने दिलं आहे. 

दरम्यान, सुशांतच्या मृत्यूवेळी त्याची रूम लॉक होती. ते लॉक तोडावं लागलं मग बेडरूमची चावी कुठं आहे? ते कोणालाच कसं माहिती नाही? याबाबत पोलिसांनी नीरजकडे चौकशी केली. नीरज म्हणाला की, मी दररोज घर स्वच्छ करत होतो. सुशांत सरांची बेडरूमही स्वच्छ करायचो. कॅपरी हाइट्समध्ये राहत होते तेव्हा मुंबईतून बाहेर जाताना ते बेडरूमला कुलूप लावायचे. किल्ली स्वयंपाक घरात ठेवत असत. तेव्हाही रूम स्वच्छ करत होतो. पण जेव्हा वांद्रे इथं शिफ्ट झाले तेव्हापासून बेडरूम फक्त कपडे बदलताना किंवा रिया आत असेल तेव्हाच बंद ठेवायचे. इतर वेळी रूमला लॉक लावत नव्हते. त्यामुळं बेडरूमची चावी कुठे असते याची माहिती नाही असं नीरजने पोलिसांना सांगितलं. 

हे वाचा - सुशांतसिंहच्या पोस्टमार्टम रिपोर्टवर CBI ने उपस्थित केले प्रश्नचिन्ह; एम्सच्या डॉक्टरांकडून होणार पडताळणी

सुशांत आठवड्यातून एक दोनवेळा घरी पार्टी करत असे अशीही माहिती नीरजने दिली. या पार्टीवेळी तो दारू प्यायचा, गांजा आणि सिगारेटही ओढायचा. सॅम्युअल जेकब सुशांतला गांजा, सिगारेटचा रोल तयार करून देत असायचा. कधी कधी मी सुद्धा रोल बनवून द्यायचो असं नीरजने सांगितलं. मृत्यूच्या आधी सुशांतसाठी तीन दिवसांपूर्वी रोल तयार करून दिले होते. मृत्यूनंतर जेव्हा सिगारेटचा बॉक्स पाहिले तर तो रिकामाच होता असंही नीरजने पोलिसांना दिलेल्या तीन पानी जबाबात म्हटलं आहे.

आदल्या दिवशी काय घडलं? शेजाऱ्यांनी दिली माहिती
सुशांतच्या घरी १३ जूनला एक पार्टी झाल्याचा दावा सुरुवातीपासून करण्यात आला. मात्र, सुशांतच्या शेजारी राहणाऱ्या महिलेने दिलेल्या माहितीनुसार १३ जूनला सुशांतच्या घरातील लाईट लवकर बंद झाल्या होत्या.  फक्त किचनची लाईट सुरु होती. सुशांतच्या फ्लॅटमधील लाईट्स इतरवेळी रात्री उशिरापर्यंत सुरू असायच्या. तसेच त्याच्या घरी कोणतीही पार्टी झाली नव्हती, अशी माहिती या महिलेनं दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sushant singh rajput housekeeper claim he found empty box of Marijuana