सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणः रिया चक्रवर्ती 'या' दोन गुन्ह्यांमध्ये आरोपी, वाचा सविस्तर

अनिश पाटील
Thursday, 10 September 2020

तीन दिवसांच्या चौकशीत रियाला या गुन्ह्यांबाबतही प्रश्न विचारल्यामुळे तिला चौकशीसाठी बोलवण्यात येणार नसल्याचे एनसीबीच्या सूत्रांनी सांगितले.

मुंबईः अंमली पदार्थांच्या तस्करीतील वित्त पुरवठ्याप्रकरणी केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाने(एनसीबी) रियाला अटक केल्यानंतर आता एनसीबीने यापुर्वीच्या गुन्ह्यांच्या तपासाला सुरूवात करणार आहेत. रियाच्या ड्रग्सबद्दलच्या चॅटप्रकरणी हा गुन्हा एनसीबीने दाखल केला होता. दरम्यान तीन दिवसांच्या चौकशीत रियाला या गुन्ह्यांबाबतही प्रश्न विचारल्यामुळे तिला चौकशीसाठी बोलवण्यात येणार नसल्याचे एनसीबीच्या सूत्रांनी सांगितले.

सक्त वसुली संचलनालयाने(ईडी) पुरवलेल्या चॅटच्या माहितीवरून एनसीबीने रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती, टॅलेंट मॅनेजर जया साहा, सुशांत सिंग राजपुतची माजी व्यवस्थापक श्रुती मोदी आणि हॉटेल व्यवसायिक गौरव आर्या यांच्या विरोधात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा कलम 20, 22, 27 व 29 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा पूर्णपणे रियाच्या व्हॉट्सअॅप चॅटवर अवलंबून होता. या चॅटमध्ये हार्ट ड्रग्सचा बोलशील, तर मी कधी जास्त वापरले नाही. मी एमडीएमए एकदा वापरलंय, त्यानंतर तिच्याकडे एमडी आहे का, असा प्रश्न रियाने या चॅटमध्ये विचारला होता. हे संभाषण रियाने कथित स्वरूपात गौरव आर्यासोबत केले असल्याचे एनसीबीच्या सूत्रांनी सांगितले.

अधिक वाचाः  मुंबई विद्यापीठाच्या परिक्षांच्या तारखा ठरल्या; ऑनलाईन पद्धतीबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर

एप्रिल महिन्यातील आणखी एका चॅटमध्ये स्टफ संपला आहे, आमपण शौविकच्या मित्राकडून घेऊया का, पण त्याच्याकडे फक्त हॅश आणि बस असते, असा प्रश्न या चॅटमध्ये मिरांडाने रियाला विचारला आहे. जून महिन्यातील जया व रियाच्या संभाषणात कॉफीमध्ये चार थेंब टाक, 40 मिनिटानं त्याला किक लागले, असा उल्लेख आहे. या चॅटवरील संभाषणाच्या आधारे एनसीबीने 15/20  क्रमांकाचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर दाखल करण्यात आलेल्या16/20 क्रमांकाच्या गुन्ह्यात एनसीबीने आतापर्यंत रिया, शौविक, मिरांडासह 10 जणांना अटक केली आहे. या दोनही गुन्ह्यांत रिया आरोपी आहे. पहिल्या गुन्ह्यांबाबतही रियाला प्रश्न विचारण्यात आल्यामुळे एनसीबी रियाला एवढ्या लवकर पुन्हा अटक करणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचाः  रियाच्या जामीनावर आज सुनावणी; सुटकेसाठी भाऊ शौविकचाही अर्ज दाखल

रियाच्या चॅटप्रकरणी दाखल गुन्ह्यांत आता एनसीबीने तपास करण्यात सुरूवात केली आहे. त्यात गौरव आर्या, जया साहा, श्रुती मोदी यांची लवकरच चौकशी होण्याची शक्यता आहे. रियाला अटक करण्यात आलेल्या गुन्ह्यांत तस्करीसाठी पैसे पुरवल्याचा कलम लावण्यात आला आहे.  तो सिद्ध झाल्यास आरोपींवर अधिक कठोर शिक्षा होऊ शकते.

शौविकला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा, दिपेश सावंत यांची एनसीबी कोठडी संपल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर दुसरीकडे रियाच्या चौकशीत समोर आलेल्या सर्वांना एनसीबीने समन्स पाठविण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये बॉलिवुडमधील मोठ्या सेलेब्रीटींचा समावेश असल्याचे समोर आले आहे.

---------------

(संपादनः पूजा विचारे) 

Sushant Singh Suicide Case Riya Chakraborty Accused Two Offenses


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sushant Singh Suicide Case Riya Chakraborty Accused Two Offenses