Sushma Andhare : बाळासाहेबांच्या शिवसेनेची उद्या डोंबिवली बंदची हाक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुषमा अंधारे

Sushma Andhare : बाळासाहेबांच्या शिवसेनेची उद्या डोंबिवली बंदची हाक

डोंबिवली : शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी संतांविषयी केलेल्या विधानाचे काही व्हिडीओ व्हायरल होत असून यामुळे वारकरी संप्रदायामध्ये नाराजीचे वातावरण आहे. अंधारे यांनी वारकऱ्यांची जाहीर माफी मागितली असली तरीही अंधारे यांचा निषेध आता राज्यभरातून होऊ लागला आहे. डोंबिवलीतील बाळासाहेबांची शिवसेना आणि वारकरी संप्रदायाने शनिवारी डोंबिवली बंदची हाक दिली आहे. यामध्ये काही व्यापारी संघटना, रिक्षा संघटना सहभागी झाल्या आहेत. काही संघटनांनी मात्र याला पाठिंबा जाहीर केलेला नाही.

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या वारकरी संप्रदायाविषयी केलेल्या भाषणाच्या व्हिडीओ क्लिप सोशल मिडीयावर व्हायरल झाल्या आहेत. त्यात अंधारे यांनी संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत नामदेव यांच्याविषयी केलेल्या विधानांवरुन वारकरी संप्रदाय आक्रमक झाला आहे. अंधारे यांनी वारकरी संप्रदायाची माफी मागितली असली तरी वारकरी संप्रदाय हे आक्रमक असल्याचे दिसत आहे. डोंबिवली शहरात वारकरी संप्रदाय आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेने अंधारे यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ शनिवारी बंदची हाक दिली आहे.

डोंबिवली शिवसेना मध्यवर्ती शाखेत शुक्रवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भागवताचार्य महंत बाळकृष्ण पाटील, ह.भ.प. प्रकाश म्हात्रे, वारकरी संप्रदाय ठाणे जिल्हाध्यक्ष ह.भ.प चेतन म्हात्रे, बाळासाहेबांच्या शिवसेनेचे दिपेश म्हात्रे, रमेश म्हात्रे, राजेश कदम, महेश पाटील, राजेश मोरे यांसह अ्नेक मान्यवर उपस्थित होते. बजरंग दल, व्यापारी संघटना यांचेही प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या भूमीवर संतांचा अपमान होत असेल तर ते योग्य नाही. याचा निषेध करण्यासाठी डोंबिवली बंदची हाक पुकारण्यात आला असल्याचे यावेळी डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे यांनी सांगितले. संतांविषयी अंधारे यांनी केलेले वक्तव्य याचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करणार असल्याचे ह.भ.प. पाटील यांनी सांगितले.