करोना विषाणूचा एक संशयित रुग्ण मुंबईत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 जानेवारी 2020

करोना विषाणूचा संशयित रुग्ण कस्तुरबा रुग्णालयात दाखल 

मुंबई : करोना विषाणूचा एक संशयित रुग्ण मुंबईत आढळला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला चीनला जाऊन आलेल्या दक्षिण मुंबईतील 36 वर्षांच्या व्यक्तीला महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, यापूर्वी आढळलेल्या तीन संशयित रुग्णांना करोना विषाणूची बाधा झाली नसल्याचे रक्ताच्या पहिल्या नमुन्याच्या तपासणीत स्पष्ट झाले. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांच्या रक्ताचे नमुने पुन्हा राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे तपासणीसाठी पाठवले जाणार आहेत.

हे ही महत्वाचे...बीकेसीतील हवा मुंबईपेक्षा घातक 

दक्षिण मुंबईत वास्तव्य असलेल्या या 36 वर्षांच्या पुरुषाला पाच दिवसांपासून खोकल्याचा त्रास होत आहे. रविवारपासून त्यांना ताप आला आहे. 11 जानेवारीदरम्यान चीनमधील शांघाय आणि अन्य एका शहरात त्याचे वास्तव्य होते. त्यामुळे त्याला कस्तुरबा रुग्णालयातील विशेष विभागात तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. लक्षणांनुसार त्यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. 

हे ही महत्वाचे...चित्रपटांमधील गांधीवाद 

चिनी नागरिकांच्या आहारातील साप अथवा वटवाघळाच्या माध्यमातून करोना या प्राणिजन्य विषाणूचा प्रादुर्भाव झाला असल्याची शक्‍यता आहे, परंतु मुंबईतील संशयित रुग्णाने चीनमधील संबंधित शहरांमधील मासळी बाजाराला भेट दिली नव्हती; तसेच या आजाराची लक्षणे असलेल्या व्यक्तीशी त्याचा संपर्क आला नव्हता, असे महापालिकेकडून सांगण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A suspected coronary virus patient in Mumbai