संशयित ‘सायबर सेल’ लक्ष्य

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 जानेवारी 2019

मुंबई - दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) ठाण्यातील मुंब्रा आणि औरंगाबादमध्ये एकाच वेळी छापे घालून नऊ संशयितांना आज ताब्यात घेतले. ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेशी संबंधित पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेशी संशयितांचा संबंध असल्याचे समजते. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्‍वभूमीवर झालेली ही महत्त्वाची कारवाई मानली जात आहे.

‘एटीएस’ने मंगळवारी मुंब्य्रातील कौसा, अमृतनगर येथून चार जणांना; तर औरंगाबादमधून पाच जणांना ताब्यात घेतले आहे. केंद्रीय यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार एटीएसने ही कारवाई केली. सर्व संशयित ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या संघटनेशी संबंधित आहेत. मुंब्य्रातून ताब्यात घेतलेल्या एका तरुणाने समाजमाध्यमावर आक्षेपार्ह पोस्टही केल्याची माहिती सूत्रांनी दिली; मात्र एटीएसकडून याबाबत अधिकृत दुजोरा देण्यात आला नाही. सर्व संशयित अनेक दिवसांपासून एटीएसच्या रडारवर होते.

सलमान नावाच्या एका संशयिताशी संबंध असल्याच्या संशयावरून ठाण्यातील मुंब्रा परिसरात छापे घालून मोहम्मद मजहर शेख, मोहसिन खान, फहाद शाह यांच्यासह आणखी एकाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून मोबाईल, लॅपटॉप आदी वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.

मुंब्रा येथून ताब्यात घेतलेले तरुण औरंगाबादला निघाले होते. त्यांच्या संपर्कातील औरंगाबादमधील पाच संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. गेल्याच महिन्यात एनआयएने दिल्लीतील जाफराबाद आणि उत्तर प्रदेशमधील अमरोहामध्ये इसिस संघटनेशी संपर्कात असलेल्या १६ ठिकाणांवर छापे घातले होते. या शोध मोहिमेत ‘एनआयए’सह उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथक सहभागी झाले होते.

सर्व उच्चशिक्षित
मुंब्रा आणि औरंगाबादमधून एटीएसने ताब्यात घेतलेले सर्व संशयित उच्चशिक्षित असून ते संगणक उत्तमरीत्या हाताळतात, अशी माहिती सूत्रांनी दिली; मात्र अद्याप कोणालाही अटक केली नसल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, एटीएसचे प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता, काही संशयितांची चौकशी सुरू असल्याच्या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला.

Web Title: Suspected Cyber Cell Target ATS Raid