परवाना निलंबित होऊनही स्कूलबस रस्त्यावर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 जुलै 2017

स्कूलबससाठी असलेल्या नियमांचे पालन आम्ही करत आहोत, यापुढेही करू; मात्र शाळांचीही तेवढीच जबाबदारी असून, त्याकडे परिवहन विभागानेही लक्ष दिले पाहिजे. 
- अनिल गर्ग (स्कूलबस ओनर्स असोसिएशन, अध्यक्ष) 

मुंबई : शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करताना स्कूल बसचालक नियमांचे पालन करतात की नाही, हा सध्या कळीचा मुद्दा आहे; मात्र स्कूल बसचालकांचे परवाने निलंबित केल्यानंतरही ते स्कूलबस चालवतात. अशा बसचालकांवर अनेकदा कारवाई झाली आहे. त्याचप्रमाणे वैध योग्यता प्रमाणपत्र नसलेल्या बसही रस्त्यावर खडखडाट करत धावताना दिसतात. 

शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना झालेले अपघात आणि त्यांच्या कारणांचा अभ्यास करून राज्य सरकारने 2011 मध्ये स्वतंत्र समितीद्वारे स्कूलबस नियमावली आणि धोरण तयार केले. त्यानंतर वर्षभराची मुदत देत 2012 मध्ये नियमावली लागू केली; मात्र अनेक नियम स्कूल बसचालक आणि मालकांनी धाब्यावर बसवले आहेत. परवाना निलंबित झाल्यानंतरही आणि वैध योग्यता प्रमाणपत्र नसूनही बस रस्त्यावर धावत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्‍यात येते. नियमांचे उल्लंघन केल्यानंतर परवाना निलंबित करूनही रस्त्यावर धावणाऱ्या 13 बसवर 2016-17 मध्ये मुंबई शहरात कारवाई करण्यात आली. सर्वांत जास्त बसगाड्यांवर नागपूर शहरात कारवाई झाली, अशी माहिती परिवहन विभागाने दिली. नागपूर शहरात अशा तब्बल 99 स्कूलबस आढळल्या. वैध योग्यता प्रमाणपत्र नसतानाही रस्त्यावर धावणाऱ्या सर्वांत जास्त स्कूलबस विदर्भात सापडल्या. विदर्भात अशा प्रकारच्या 354 बसवर कारवाई करण्यात आली. त्याखालोखाल पुण्यात 136 बसवर कारवाई झाली. 
स्कूल बसचालक सुरक्षेच्या निकषांचे पालन करतात का, याची तपासणी करण्याच्या सूचना मुंबई उच्च न्यायालयानेही गुरुवारी राज्य सरकारला दिल्या. हा प्रश्‍न शाळांवर सोडून चालणार नाही, असेही स्पष्ट केले. 

सर्वाधिक कारवाई झालेले विभाग 
विभाग- परवाना निलंबित झाल्यानंतरही धावणाऱ्या बस- वैध योग्यता प्रमाणपत्र नसूनही रस्त्यावर धावणाऱ्या बस 

मुंबई - 13 - 45 
पुणे - 11 - 136 
कोल्हापूर - 61 - नाही 
नागपूर शहर - 99 - नाही 
विदर्भ - नाही - 354 
मराठवाडा - नाही - 88 

स्कूलबससाठी असलेल्या नियमांचे पालन आम्ही करत आहोत, यापुढेही करू; मात्र शाळांचीही तेवढीच जबाबदारी असून, त्याकडे परिवहन विभागानेही लक्ष दिले पाहिजे. 
- अनिल गर्ग (स्कूलबस ओनर्स असोसिएशन, अध्यक्ष) 

स्कूलबस नियम काय सांगतात? 
1) शाळेतील मुलांची ने-आण करणे, परिवहन शुल्क, बसथांबे निश्‍चित करणे याकडे लक्ष देण्यासाठी प्रत्येक शाळेत परिवहन समिती असेल. ही समिती वाहनांच्या नोंदणी प्रमाणपत्र, योग्यता प्रमाणपत्र, विमा प्रमाणपत्र, पीयूसी, अग्निशमन यंत्रणा, प्रथमोपचार सुविधा इत्यादींची पडताळणी करेल. 
2) शाळेतील मुलांच्या सुरक्षित प्रवासासाठी शाळेचे मुख्याध्यापक, प्राचार्य जबाबदार असतील. शाळेतील मुलांची ने-आण करताना ती कशी केली जाते, याकडे दररोज लक्ष पुरवण्यासाठी आवश्‍यक पावले उचलतील. 
3) शाळेच्या प्रशासकांनी वाहतूक पोलिसांशी विचारविनिमय करून आणि त्यांच्या व स्थानिक प्राधिकरणाच्या मदतीने शाळेजवळ आवश्‍यक ती चिन्हांकने आणि खुणा लावण्याची खबरदारी घ्यावी. 
4) प्रत्येक शाळेच्या प्रशासनाने त्यांच्या शाळेतील मुलगे आणि मुलींची योग्य रकमेची सर्वसमावेशक विमा पॉलिसी काढावी. शालेय प्रशासनाने विम्याच्या हप्त्यासाठी देय असणारी रक्‍कम विद्यार्थ्यांच्या शालेय शुल्कातून वसूल करावी. 
5) शाळेतील मुलांची ने-आण करताना कोणत्याही कर्मचाऱ्याने बसमध्ये संगीत अथवा गाणे लावू नये.

Web Title: Suspended license on school bus street