मनसेच्या नितीन नांदगावकर यांना तडीपारीची नोटीस

वृत्तसंस्था
गुरुवार, 21 फेब्रुवारी 2019

नांदगावकर यांच्याकडून सतत विविध प्रकारचे प्रयत्न करून समाजकार्य केले जाते. यामध्ये ते स्वत: रस्त्यावर उतरतात आणि चुकीच्या पद्धतीने वागणाऱ्यांना 'मनसे स्टाईल' धडा शिकवतात.

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे सरचिटणीस नितीन नांदगावकर यांना पोलिसांकडून तडीपारीची नोटीस बजावण्यात आली आहे. नांदगावकर यांच्याकडून सतत विविध प्रकारचे प्रयत्न करून समाजकार्य केले जाते. यामध्ये ते स्वत: रस्त्यावर उतरतात आणि चुकीच्या पद्धतीने वागणाऱ्यांना 'मनसे स्टाईल' धडा शिकवतात.

नांदगावकर नेहमीच सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी रस्त्यावर उतरत असतात. तसेच महाराष्ट्रातील विविध सामाजिक कार्यातही त्यांचा पुढाकार असतो. मुजोर रिक्षाचालकांपासून चुकीच्या मार्गाने वागणाऱ्यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जात आहे. नांदगावकर यांच्या या सामाजिक कार्यामुळे सर्वसामान्यांमध्येही ते अत्यंत लोकप्रिय आहेत.

याशिवाय त्यांच्या या सामाजिक कार्याचे व्हिडिओही फेसबुक, व्हॉट्सअॅप यांसारख्या सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यांचे फेसबुक पेजही आहे. यामध्येही त्यांच्या कार्याचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. मात्र, आता पोलिसांकडून त्यांच्याविरोधात तडीपारीची नोटीस बजावली आहे. 

दरम्यान, नांदगावकर यांना पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतर याविरोधात मनसे कार्यकर्ते एकवटले आहेत. तसेच यावरून सोशल मीडियावरही मुंबई पोलिसांविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

Web Title: Tadipar Notice to MNS leader Nitin Nandgaonkar