अरे वाह! पालिकेच्या नायर रुग्णालयातील डॉक्टरांना पुन्हा 'ताज' चे जेवण; 1 जुलैपासून होणार सुरुवात 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

हॉटेल ताजकडून पालिका रुग्णालयातील डॉक्टरांसह हेल्थकेअर कर्मचाऱ्यांना मोफत जेवण पुरवण्यात येत होते. मात्र, काही दिवसांपूर्वी हे जेवण बंद करण्यात आल्याने रुग्णालयातील कर्मचार्यांना जेवण पुरवण्यात अडचण येत होती.

मुंबई: हॉटेल ताजकडून पालिका रुग्णालयातील डॉक्टरांसह हेल्थकेअर कर्मचाऱ्यांना मोफत जेवण पुरवण्यात येत होते. मात्र, काही दिवसांपूर्वी हे जेवण बंद करण्यात आल्याने रुग्णालयातील कर्मचार्यांना जेवण पुरवण्यात अडचण येत होती. मात्र, आता ताजकडून पुन्हा एकदा या कर्मचार्यांना जेवण देण्यात येणार आहे. 

25 जूनपासून हा जेवण पुरवठा बंद करण्यात आला होता. गेले दोन महिने न चुकता ताज हॉटेलकडून जेवण पुरवत असल्याने निवासी डॉक्टरांचा जेवणाचा प्रश्न निकालात निघाला होता. मात्र, पुन्हा जेवण बंद झाल्याने डाॅक्टर्स स्वखर्चाने जेवण मागवत होते. पण, ही समस्या सुटली असून पुन्हा ताज कडून जेवण पुरवलं जाणार आहे. 

हेही वाचा: वीजबिल जास्त येण्यामागची 'ही' आहेत कारणं, 'म्हणून' बसलाय तुम्हाला वीजबिलाचा शॉक

मुंबईत कोरोनामुळे युद्धजन्य स्थिती निर्माण झाली आहे. यात सरकारसह सामाजिक संस्थाही मदतीला धावून आल्या. या युद्धात अत्यावश्यक सेवेतील आरोग्य क्षेत्रातील डॉक्टर तसेच कर्मचाऱ्यांचा सर्व समस्या उफाळून वर आल्या. हे क्षेत्र अत्यंत महत्वाचे‌ असल्याने ताज हॉटेलने यांच्या नाश्ता तसेच जेवणाचा प्रश्न सोडवला. 

दररोज नाश्ता तसेच जेवण ताज मधून येत असल्याचे नायर रुग्णालयातील कर्मचारी सांगतात. हे जेवण उद्यापासून सुरू करण्यात येणार आहे. पालिका रुग्णालयांचे कँटीग आहेत. मात्र बहुतांश कँटींगमधील कर्मचारी क्वारंटाईन अथवा बाधित झाल्याने नियमानुसार बंद आहेत. ताज हॉटेलकडून सकाळी 11 ते 3 आणि सायंकाळी 7 ते 8.30 या काळात जेवणाची पाकिटे दिली जात होती. त्यात डाळ भात, भाजी, फळे, केक आणि स्वीट असे पदार्थ दिले जात होते. ताजकडून दिली जाणारी ही जेवणाची पाकिटे सर्वांना रोज वेळेवर पोहोचत होती, असेही डॉक्टरांनी सांगितले.

TAJ hotel to provide food to doctors 

हेही वाचा: कोरोनाची भीती दाखवून रुग्णांची लूट; कल्याण पूर्वेतील धक्कादायक प्रकार...

"उद्यापासुन ताज हॉटेलकडून जेवण पुरवले जाणार आहे. 25 जून या दिवशी ताजकडून जेवण पुरवलं जात नव्हतं. मात्र, आता उद्यापासून जेवण पुरवले जाणार असून डाॅक्टर्स आणि इतर कर्मचार्यांच्या जेवणाचा प्रश्न सुटणार आहे आणि दोन वेळा जेवण पुरवलं जाणार आहे", असे नायर मार्डचे अध्यक्ष डॉ. सतिश तांदेळ यांनी म्हंटले आहे.   
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: TAJ hotel to provide food to doctors