लठ्ठपणा गांभीर्याने घ्या, अन्यथा चाळीशीच्या आधीच उद्भवतील अनेक समस्या

लठ्ठपणा गांभीर्याने घ्या, अन्यथा चाळीशीच्या आधीच उद्भवतील अनेक समस्या

मुंबई : लठ्ठपणाचे प्रमाण सध्या दिवसेंदिवस वाढत असून वाढते वजन ही सध्याच्या काळातील सर्वात मोठी सामान्य समस्या आहे. वाढत्या वजनामुळे अनेक आजारांना नियंत्रण मिळते. पण आता वाढत्या वजनामुळे गुडघे दुखीची समस्या अधिकच दिसून येत आहे. लठ्ठपणाने त्रस्त असणाऱ्या 80 ते 90 टक्के लोकांना गुडघेदुखीची समस्या असते. लठ्ठ व्यक्तींमध्ये वयाच्या चाळीशीच्या आधीच अनेकदा गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करून घ्यावी लागत आहे. याचं कारण वजन वाढीमुळे शारीरिक हालचालींवर परिणाम होत आहे. त्यामुळे वजन वाढू नये, यासाठी लठ्ठपणा अतिशय गांभीर्याने घेण्याची गरज आहे, असे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.

लठ्ठपणा म्हणजे शरीरात अतिप्रमाणात चरबीचा साठा होणे. अतिलठ्ठपणा हा वैदयकीयशास्त्राने अत्यंत गंभीर आजार म्हणून घोषित केलेला आहे. दुदैवान तरीसुद्धा या विकाराकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. लठ्ठपणामुळे मधुमेह, हृदयविकार, रक्तदाब हे आजार वाढत आहेत. असंतुलित आहार पद्धती म्हणजे कधीही काहीही खाणे, चुकीचा आहार घेणं, वेळेवर न झोपणं, व्यायाम न करणं यांसारख्या गोष्टी वाढत्या वजनाला कारणीभूत आहेत. लठ्ठपणा आणि बदलती जीवनशैली यांच्याशी संबंधित विकारामुळे सध्या अनेक जण त्रस्त आहेत. त्याच अनेकांना गुडघेदुखीचा त्रास असतो.

चाळीशीआधी गुडघे बदलण्याची गरज -

अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयातील बॅरिअट्रिक आणि लॅपरोस्कोपिक सर्जन डॉ. अपर्णा गोविल भास्कर यांनी सांगितले की, "लठ्ठ व्यक्तींमध्ये अतिरिक्त वजनामुळे शारीरिक हालचाल करता येत नाही. वजन वाढल्याने ठराविक कालावधीनंतर सांध्यावर आणि गुडघ्यावर परिणाम होऊ लागतो. आम्ही नियमितपणे अशा रुग्णांना पाहतो ज्यांना 40 व्या वर्षाच्या आधीच गुडघे बदलण्याची वेळ आली. वजन जास्त असल्याने चालता येत नसल्याने दैनंदिन कामासाठी अनेक जण घरातील अन्य सदस्यांवर अवलंबून असतात."

तज्ज्ञ डॉक्टरांच्या मते, लठ्ठ व्यक्तीमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. यामुळे टाईप-2 मधुमेह होतो. लठ्ठपणा आणि टाइप 2 मधुमेह हे दोन्ही इन्सुलिन रेजिस्टंसशी संबंधित आहेत. आपण जे अन्न खातो, त्याचे शरीरात आवश्यक ऊर्जेसाठी साखरेत रूपांतर होते. आपल्या जठराजवळ असणाऱ्या स्वादुपिंडामध्ये तयार झालेले इन्सुलिन शरीराच्या पेशींत साठवलं जातं. मधुमेह झालेल्या व्यक्तींत इन्सुलिन तयार होण्याची प्रक्रिया मंदावलेली असते. आवश्यकतेनुसार इन्सुलिन शरीरात तयार होत नसल्याने शरीरातील साखरेचे प्रमाण वाढू लागते. यामुळे मधुमेह होतो. हे लक्षात घेतले पाहिजे की, भारतात लठ्ठ व्यक्तींची वाढती आकडेवारी पाहता मधुमेहाने ग्रस्त व्यक्तींची संख्याही वाढतेय. वेळीच निदान व उपचार न घेतल्यास मृत्यू होण्याचीही दाट शक्यता असते.

पीसीओएस समस्या वाढती-

डॉ. अपर्णा म्हणाल्या की, "लठ्ठ व्यक्तींमध्ये वाढत्या चरबीमुळे उच्च रक्तदाबाचा धोकाही उद्भवू शकतो. लठठपणामुळे होणाऱ्या संबंधित आजारांना “मेटाबोलिक सिंड्रोम” म्हणतात. याशिवाय लठ्ठपणामुळे यूरिक अँसिडची पातळी देखील वाढू शकते. महिलांमध्ये लठ्ठपणामुळे निर्माण होणारी पीसीओएस ही मोठी समस्या आहे. या समस्येमुळे मासिक पाळी अनियमित होते. यावर वेळीच उपचार न घेतल्यास अनेक महिलांना वंधत्वांचा सामना करावा लागतो. बर्‍याचदा लठ्ठपणामुळे नैराश्याचा सामना करावा लागतो. "

लठ्ठपणा ही एक गंभीर स्थिती आहे आणि इतर कोणत्याही आजाराप्रमाणेच यावरही उपचार केले जाणे आवश्यक आहे. वजन वाढविणे प्रतिबंध हे लक्ष्य असणे आवश्यक आहे. यासाठी लठ्ठपणामुळे त्रस्त असलेल्या व्यक्तींनी वजन कमी करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टराचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

Take obesity seriously otherwise knee problems can occur before the age of forty

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com