तळोजा कारागृहातील पोलिस वसाहतीची दुरवस्था

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 जुलै 2018

नवी मुंबई - तळोजा मध्यवर्ती तुरुंगातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वसाहतीमधील इमारतींची १० वर्षांत देखभाल व दुरुस्ती केली नसल्याने त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे पोलिस व त्यांच्या कुटुंबीयांना जीव मुठीत घेऊन राहावे लागत आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तुरुंग प्रशासनाने अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही त्याचा काहीच उपयोग झालेला नाही, असे येथील अधिकाऱ्यांनी सांगितले.

नवी मुंबई - तळोजा मध्यवर्ती तुरुंगातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वसाहतीमधील इमारतींची १० वर्षांत देखभाल व दुरुस्ती केली नसल्याने त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे पोलिस व त्यांच्या कुटुंबीयांना जीव मुठीत घेऊन राहावे लागत आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तुरुंग प्रशासनाने अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही त्याचा काहीच उपयोग झालेला नाही, असे येथील अधिकाऱ्यांनी सांगितले.

मुंबई आणि ठाणे येथील तुरुंगांत क्षमतेपेक्षा जास्त कैदी झाल्याने पर्याय म्हणून तळोजा येथे नवीन तुरुंगासाठी इमारत बांधली. २००८ मध्ये ते सुरू झाले. येथे जेलर, पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठीही निवासाची सोय केली; परंतु १० वर्षांत या वसाहतीमधील इमारतींची व घरांची सार्वजनिक बांधकाम विभागाने देखभाल, दुरुस्ती किंवा रंगरंगोटी केलेली नाही. या इमारतींचे बांधकाम निकृष्ट असल्याने काही वर्षांतच त्यांची पडझड सुरू झाली. येथील बहुतांश घरांमधील इलेक्‍ट्रिकचे फिटिंग तुटले आहे. भिंतींना तडे गेले असून, प्लास्टर कोसळले आहे. त्यामुळे या इमारती धोकादायक बनल्या आहेत. 

सध्या पावसाळा सुरू असल्याने येथील घरांची बिकट अवस्था झाली आहे. इमारतींचे छत गळत असून, भिंतीतून पाणी पाझरत आहे. त्यामुळे प्लास्टर कोसळण्यासारखे प्रकार घडत आहे, असे पोलिसांनी सांगितले. येथील इमारतींमध्ये कोंदट व घाणीचे साम्राज्य पसरले आहे. स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे कुटुंबीयांसह जीव मुठीत घेऊन राहावे लागत असल्याचे एका कर्मचाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. शेकडो कुटुंबांना धोका

सार्वजनिक बांधकाम विभागाने तळोजा तुरुंग परिसरात पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी तीन-चार मजली १६ इमारती बांधल्या आहेत. यातील दोन इमारती जेलर व त्यांच्या कुटुंबीयांसाठी तर उर्वरित १४ ते १५ इमारती पोलिस शिपाई व सुभेदारांसाठी आहेत. तेथे शेकडो पोलिस कुटुंबे राहतात. त्यांना या धोकादायक इमारतींमुळे धोका निर्माण झाला आहे. 

सरकारकडून निधी मिळाला नसल्यामुळे तळोजा तुरुंगाच्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची देखभाल व दुरुस्ती होऊ शकली नव्हती; परंतु आता आम्ही या निवासस्थानातील शौचालय आणि बाथरूमच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आहे. पावसाळ्यानंतर इमारतींची गळती थांबवण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. 
- मधुसूधन नेवारे, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, पनवेल

Web Title: Taloja-jail-police-colonies