esakal | कोरोनावर प्रभावी 'विराफीन' बद्दल तात्याराव लहानेंनी दिली महत्त्वाची माहिती

बोलून बातमी शोधा

तात्याराव लहाने
कोरोनावर प्रभावी 'विराफीन' बद्दल तात्याराव लहानेंनी दिली महत्त्वाची माहिती
sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: देशात सध्या सर्वत्र कोरोनाचा कहर सुरु असताना झायडस कॅडिलाने (Zydus Cadila) एक मोठी दिलासा देणारी बातमी दिली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण हा एकमेव मार्ग दिसत असतानाच झायडस कॅडिलाने कोरोनावरील उपचारांमध्ये प्रभावी ठरणारे 'विराफीन' नावाचे औषध बनवले आहे. Drugs Controller General of India ने इमर्जन्सीमध्ये या औषधाला मंजुरी दिली आहे. हे औषध घेतल्यानंतर 7 दिवसांच्या आत रुग्ण बरा होतो, असा झायडसचा दावा आहे.

या संदर्भात राज्याच्या टास्क फोर्सचे सदस्य प्रख्यात नेत्रतज्ञ तात्याराव लहाने यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. "कोरोनामुळे चिंताजनक स्थिती असलेल्या रुग्णांना हे औषध देण्यात आले. देशात एकूण २५० रुग्णांवर या विराफीन इंजेक्शनची चाचणी घेण्यात आली. त्यात १० रुग्ण मुंबईच्या सेंट जॉर्ज रुग्णालयातील होते. विराफीन इंजेक्शन दिल्यानंतर ऑक्सिजनची गरज कमी झाली" असे लहाने यांनी सांगितले.

हेही वाचा: विरार हॉस्पिटल अग्नितांडव नॅशनल न्यूज नाही - राजेश टोपे

"फक्त हे इंजेक्शन देऊन सर्वकाही होत नाही. त्याबरोबर अन्य उपचारही सुरु ठेवावे लागतात. अन्य औषधांबरोबर विराफीनचे इंजेक्शन दिले तर रुग्णांवर त्याचा परिणाम दिसून येतो" असे तात्याराव लहाने यांनी सांगितले. ते एबीपी माझा वृत्तवाहिनीशी बोलत होते. सात दिवसात कोरोना रुग्ण बरा होतो, या कंपनीच्या दाव्याबद्दल विचारले असता तात्याराव लहाने म्हणाले की, "अभ्यासातून असे दिसलेय की, विराफीन दिल्यानंतर दोन ते तीन दिवसांनी रिकव्हरी रेट फास्ट दिसलाय. परिणाम होण्यासाठी म्हणून बाकीची औषधही सुरु ठेवावी लागतात. एकटया औषधाने भागत नाही."

हेही वाचा: महाराष्ट्राच्या मदतीला AIR FORCE, ऑक्सिजनचं एअरलिफ्ट नाही पण...

कुठल्या वयोगटासाठी हे विराफीन वरदान आहे, या प्रश्नावर ते म्हणाले की, "ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांसाठी हे औषध फायद्याचे आहे. वयोमान जास्त असलेल्या रुग्णांसाठी विराफीनचा फायदा होतो. सगळ्या वयोगटातील लोकांवर या औषधाची चाचणी घेण्यात आली."

रेमडेसिव्हीर प्रमाणे विराफीन औषधाचा वापरल गेलं तर स्टॉकचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यावर "झायडस कॅडिलाने किती तयारी केलीय ते पहावा लागेल. पहिल्या ट्रायलचे परिणाम चांगले दिसून आलेत" असे तात्याराव लहाने म्हणाले.