
50 कोटी रुपयांचा टिडीआर घोटाळा प्रकरणी तत्कालीन तलाठी शिवाजी भोईर व तत्कालीन तलाठी बी. बी. केदार यांच्याविरोधात विष्णुनगर पोलिस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाकुर्ली मंडळ अधिकारी दिपक गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाणे : 50 कोटी रुपयांचा टिडीआर घोटाळा प्रकरणी तत्कालीन तलाठी शिवाजी भोईर व तत्कालीन तलाठी बी. बी. केदार यांच्याविरोधात विष्णुनगर पोलिस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाकुर्ली मंडळ अधिकारी दिपक गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डोंबिवली पश्चिमेतील गावदेवी येथे 50 कोटी रुपयांचा टिडीआर घोटाळा झाल्याची तक्रार नगरसेवक प्रकाश भोईर यांनी उप लोकआयुक्तांकडे केली होती. चौकशीअंती मुळ दप्तरात खाडाखोड असतानाही त्याचा वरिष्ठांना कोणताही अहवाल सादर न करता तलाठी शिवाजी भोईर व बी. केदार यांनी बेकायदेशीर सातबारा वितरीत केल्याची बाब चौकशीत उघड झाली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी कल्याण तहसीलदार दिपक आकडे यांना केदार व भोईर यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्याचे निर्देश दिले होते.
जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार तहसीलदार आकडे यांनी ठाकुर्ली मंडळ अधिकाऱ्यांना संबंधीत तलाठींविरोधात स्थानिक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देताच शुक्रवारी 27 नोव्हेंबरला भोईर व केदार यांच्याविरोधात मंडळ अधिकारी दिपक गायकवाड यांनी तक्रार दाखल केली असून भोईर व केदार यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-------------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)