तंत्रज्ञान क्षेत्रात नोकरकपातीची लाट! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तंत्रज्ञान क्षेत्रात नोकरकपातीची लाट!

तंत्रज्ञान क्षेत्रात नोकरकपातीची लाट!

मुंबई : वाढत्या महागाईसोबत वाढलेला खर्च लक्षात घेता जगभरातील अनेक तंत्रज्ञान कंपन्यांनी नोकरकपातीचा सपाटा लावला आहे. ट्विटर, मेटापाठोपाठ आता ॲमेझॉनही दहा हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार आहे. त्यामुळे आतापर्यंत जगभरातील सव्वालाख कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचे संकट कोसळले आहे.

वाढता तोटा कमी करण्यासाठी जगभरातील अनेक तंत्रज्ञान कंपन्यांनी नोकरकपातीचा निर्णय घेतला आहे. या क्षेत्रातील अनेक कंपन्यांच्या महसुलात मोठी घट झाली आहे. त्याशिवाय अनेक देशांमध्ये मंदीसदृश वातावरण असल्याने बँक ऑफ अमेरिकेने बेरोजगारीचा दर ६.५ टक्क्यांवर जाण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

निर्बंध हटल्याने फटका

कोरोना काळात जगभरातील लोक घरात असल्याने ऑनलाईन खरेदी आणि घरबसल्या मनोरंजनासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मची मोठी चलती होती; मात्र आता सर्वत्र निर्बंध शिथिल झाल्याने ई-कॉमर्स वा ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली. त्याचाच फटका ॲमेझॉनला बसला आहे.

‘डिस्ने’चाही इशारा

ट्विटर, मेटा, ॲमेझॉनसह इतर कंपन्यांनी तोटा कमी करण्यासाठी नोकरकपातीचे पाऊल उचलले आहे. तसेच ‘डिस्ने’चे सीईओ बॉब चापेक यांनी कर्मचाऱ्यांना पत्र पाठवत गेल्या १.४७ अब्ज डॉलरचे नुकसान झाल्याची माहिती दिली. त्यावरून डिस्नेच्या कर्मचाऱ्यांवरही बेरोजगारीची संक्रांत ओढवण्याची शक्यता आहे.

नोकरकपात

मेटा १३%

ट्विटर ५०%

रॉबिनहूड ३०%

इंटेल २०%

स्नॅप २०%

स्ट्राईप १३%

लिफ्ट १३%

ॲमेझॉन ३%