तेलंगणमध्ये जाण्यास इच्छुक गावांना शिवसेनेचा दिलासा; निधी जाहीर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 जून 2018

मुंबई - मराठवाडा मुक्‍तीसंग्रामानंतरही पायाभूत सुविधांपासून वंचित असलेल्या धर्माबाद तालुक्‍यातील अनेक गावांनी तेलंगणमध्ये समाविष्ट करण्यासाठी सुरू केलेल्या आंदोलनाला शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज दिलासा दिला. या तालुक्‍यातील प्रलंबित प्रश्‍नांवर पालकमंत्री रामदास कदम यांच्याकडे आज मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीत धर्माबादमधील मुस्लिम समाजाच्या शादीखानाला 50 लाख रुपये, सांस्कृतिक भवनला 50 लाख, 14 पुनर्वसित गावांतल्या मूलभूत सुविधांसाठी 4 कोटी रुपयांचा निधी देण्याचे जाहीर करण्यात आले. तर, 30 गावांतील रस्त्यांसाठी 3 कोटी, तलावातील गाळ काढण्यासाठी 1 कोटी, धर्माबाद मिरची संशोधन केंद्रासाठी 1 कोटी, शहरातील उड्डाण पुलांसाठी 50 कोटी, तर धर्माबादमधील एसटी डेपोसाठी तातडीने जागा उपलब्ध करून देण्याचे निर्णय झाल्याची माहिती सरपंच संघटनेचे अध्यक्ष बाबूराव कदम यांनी दिली. आजच्या बैठकीनंतर सुरू असलेले आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात येत असले, तरी एक महिन्यात या कामांचा शुभारंभ झाला तरच आंदोलन कायमस्वरूपी थांबवले जाईल, असे कदम यांनी स्पष्ट केले.
Web Title: telangana interested village shivsena fund