आयडॉलच्या परीक्षांसाठी मागवल्या निविदा, आज रात्री निविदा होणार खुल्या

तेजस वाघमारे
Thursday, 15 October 2020

विद्यापीठाने यापूर्वीच्या कंपनीकडून काम काढून घेतले आहे. ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी आयडॉलने निविदा मागविल्या आहेत. या निविदा आज रात्री साडे दहा वाजता खुल्या करण्यात येणार आहेत.

मुंबईः  मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या (आयडॉल) तृतीय वर्ष बीकॉम आणि बीएच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षेच्या सर्व्हरवर सायबर अटॅक झाल्याने सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. त्यामुळे विद्यापीठाने यापूर्वीच्या कंपनीकडून काम काढून घेतले आहे. ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी आयडॉलने निविदा मागविल्या आहेत. या निविदा आज रात्री साडे दहा वाजता खुल्या करण्यात येणार आहेत.

आयडॉलच्या तृतीय वर्ष बीकॉम आणि बीएच्या परीक्षेस 3 ऑक्‍टोबरपासून सुरुवात झाली. ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी लिटल मोअर इनोव्हेशन या कंपनीची नेमणूक करण्यात आली होती. मात्र परिक्षेच्या पहिल्या दिवसापासून विद्यार्थ्यांना परीक्षेची लिंक, लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळत नसल्याचे प्रकार घडत असल्याने विद्यार्थ्यांनी आयडॉल इमारतीबाहेर गोंधळ घातला होता. विद्यार्थी संघटनांनीही विद्यापीठावर तीव्र टीका केली होती. मात्र ऑनलाईन परीक्षेच्या सर्व्हरवर सायबर अटॅक झाल्याचा प्रकार समोर येताच विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. 

पुढे ढकल्यात आलेली परीक्षा 19 ऑक्‍टोबरपासून घेण्याचा विद्यापीठाकडून प्रयत्न सुरू आहे. त्यानुसार आयडॉलने ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी अनुभवी कंपन्यांकडून निविदा मागविल्या आहेत. या निविदा आज खुल्या करण्यात येणार आहेत. या निविदा प्रक्रियेला प्रतिसाद लाभल्यास विद्यापीठाच्या परीक्षा वेळेत घेता येणार आहेत. कंपन्यांनी याकडे पाठ फिरवल्यास पुन्हा निविदा प्रक्रियेला मुदतवाढ द्यावी लागेल. असे झाल्यास आयडॉलच्या परीक्षा लांबणीवर जाऊ शकतात.

अधिक वाचाः  विधानपरिषद नियुक्तीवरून कॉंग्रेसमध्ये नाराजी, चार नावे कुणाची?

आयडॉलने एफवाय एफवाय बीए बीकॉम, बीएस्सी आयटी सेमिस्टर चार आणि पाच, एमसीए सेमिस्टर 1 ते 5,  अशा विविध परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या अभ्यासक्रमाच्या परीक्षा 19 तारखेपासून सुरू होणार आहेत. 
 

सायबर अटॅक प्रकरणी गुन्हा दाखल

आयडॉलने ऑनलाइन परीक्षेला सायबर अटॅकमुळे पुढे ढकलल्या. याप्रकरणी विद्यापीठाने पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

अधिक वाचाः  मुंबईत 2 लाखांहून अधिक रूग्ण कोरोनामुक्त, बरे होण्याचा दर 85 टक्क्यांवर

 निविदा न मागवताच कंपनीची केली होती नेमणूक

आयडॉलच्या अंतिम सत्राच्या परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठाने निविदा प्रक्रिया न करताच कंपनीची नेमणूक केली होती. या कंपनीकडून परीक्षांचा गोंधळ झाल्यानंतर अखेर विद्यापिठाने नव्याने निविदा मागवल्या आहेत.

----------------------------

Tenders invited for Idol exams, tenders will be open tonight


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tenders invited for Idol exams, tenders will be open tonight