दहावीच्या विद्यार्थ्यांना पुन्हा अंतर्गत गुण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

मुंबई : राज्य मंडळातील दहावीच्या विद्यार्थ्यांना या शैक्षणिक वर्षापासून पुन्हा अंतर्गत गुण मिळणार आहेत. भाषा आणि समाजशास्त्राची लेखी परीक्षा 80 गुणांची असेल, आणि 20 अंतर्गत गुण असतील, अशी घोषणा गुरुवारी (ता. 8) शालेय शिक्षणमंत्री आशीष शेलार यांनी केली. आगामी शैक्षणिक वर्षापासून बारावीच्या विद्यार्थ्यांचे अंतिम मूल्यमापन 650 ऐवजी 600 गुणांचे असेल.

मुंबई : राज्य मंडळातील दहावीच्या विद्यार्थ्यांना या शैक्षणिक वर्षापासून पुन्हा अंतर्गत गुण मिळणार आहेत. भाषा आणि समाजशास्त्राची लेखी परीक्षा 80 गुणांची असेल, आणि 20 अंतर्गत गुण असतील, अशी घोषणा गुरुवारी (ता. 8) शालेय शिक्षणमंत्री आशीष शेलार यांनी केली. आगामी शैक्षणिक वर्षापासून बारावीच्या विद्यार्थ्यांचे अंतिम मूल्यमापन 650 ऐवजी 600 गुणांचे असेल.

मागील (2018-19) शैक्षणिक वर्षात दहावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण रद्द करून निकाल लावण्यात आले. त्यामुळे राज्य मंडळाच्या निकालात मोठी घसरण झाली. आयसीएससी आणि सीबीएससी यांचे विद्यार्थी राज्य मंडळाच्या (एसएससी बोर्ड) विद्यार्थ्यांपुढे निघून गेल्यामुळे शहरी भागात प्रचंड नाराजी पसरली. राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना शहरांतील महाविद्यालयांत प्रवेश घेताना अडचणी येऊ लागल्या. त्यामुळे दहावीचे अंतर्गत गुण रद्द करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनीही केली होती.

या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने फेरविचार करण्यासाठी समिती नियुक्त केली होती. या समितीच्या अहवालानुसार दहावीच्या विद्यार्थ्यांना पुन्हा अंतर्गत गुण देण्याचा निर्णय घेण्यात आला. या शैक्षणिक वर्षात नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यासाठी हा निर्णय लागू राहील.
कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर यंदा अकरावी आणि पुढील वर्षी बारावीचे अंतिम मूल्यमापन 650 ऐवजी 600 गुणांचे राहील. सध्या पर्यावरण शास्त्र विषयात 50 गुण देण्यात येतात; त्याऐवजी श्रेणी देण्यात येईल, असे शेलार यांनी सांगितले.

25 टक्के बहुपर्यायी
सीबीएससी मंडळाप्रमाणे राज्य मंडळाच्या दहावी आणि बारावी परीक्षांत बहुपर्यायी किंवा वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या प्रश्‍नांसाठी 25 टक्के गुण असतील. दहावीच्या भाषा विषयाच्या अंतर्गत मूल्यमापनात श्रवण व भाषण कौशल्यांचा समावेश करण्यात आला आहे. अन्न विषयात गृहपाठ, बहुपर्यायी प्रश्‍न, उपक्रम आदी समाविष्ट करण्यात आले आहेत.

शिक्षणात जलसुरक्षा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलसुरक्षा हा विषय देशपातळीवर हाती घेतला आहे. महाराष्ट्रातील नववी ते बारावीच्या अभ्यासक्रमांत हा विषय समाविष्ट करण्यात येईल. हा विषय असलेले महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे, असे आशीष शेलार यांनी सांगितले.

ैथोडक्‍यात महत्त्वाचे
- दहावीची अंतिम परीक्षा त्याच वर्षीच्या अभ्यासक्रमावर आधारित.
- दहावीला भाषा आणि समाजविज्ञानासाठी 20 अंतर्गत गुण.
- अकरावी, बारावीसाठी अंतर्गत मूल्यमापन वर्षभरात पूर्ण.
- अकरावी, बारावीच्या वार्षिक परीक्षा संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tenth state board student get interim mark