गँग्ज ऑफ मुंबई : चड्डी-बनियान टोळीचा हैदोस

चड्डी-बनियान टोळीची दहशत
चड्डी-बनियान टोळीची दहशत

मुंबई : सध्या राजस्थानात दहशत माजवत असलेल्या चड्डी-बनियान टोळीचा एक कारनामा नुकताच डोंबिवलीतही उघड झाला आणि ही टोळी पुन्हा एकदा चर्चेत आली. वस्तुतः चड्डी-बनियान टोळी नावाने ओळखल्या जाणाऱ्या या भिन्न टोळ्या आहेत. मोडस ऑपरेंडी साधारणतः सारखीच असल्याने या वेगवेगळ्या टोळ्यांना हे विशेषनाम मिळाले. ही खरी घरफोडे आणि दरोडेखोरांचीच टोळी; मात्र अधिक क्रूर. २०१४ मध्ये एका चड्डी-बनियान गॅंगने दोन पोलिसांची हत्या केली होती. त्यापैकी चार जणांना नंतर पकडण्यात आले. काही वर्षांपूर्वी तिने वसई-विरार, कल्याण-डोंबिवली या भागांत धुमाकूळ घातला होता. २०१६ मध्ये बोरिवली पश्‍चिमेकडील साईकृपा सोसायटीत एका घरावर या टोळीने दरोडा टाकला. त्याची चित्रफीत मोठ्या प्रमाणावर पसरली होती. त्या वेळी एका नागरिकाने त्या टोळीला पाहिले. त्याने पोलिसांना कळवले. मोठे ‘कोम्बिंग ऑपरेशन’ करून पोलिसांनी त्यातील तिघांना अटक केली.

तमिळनाडू, झारखंड, बिहार आदी राज्यांतून परराज्यात जाऊन घरफोड्या करणाऱ्या अनेक टोळ्या आहेत. दुष्काळाच्या काळात गावाकडे काम न मिळाल्यामुळे शहरांमध्ये येऊन चोऱ्या करणारे चड्डी-बनियानधारी यापूर्वी पकडले गेले आहेत.

गुन्ह्याची ठिकाणे
शक्‍यतो बंद घरांना ही टोळी लक्ष्य करते; मात्र अनेकदा वस्तीपासून दूर असलेल्या बंगल्यांवरही या टोळीने दरोडे टाकलेले आहेत.

गॅंगची कार्यपद्धत 
केवळ चड्डी-बनियान हा वेश करायचा. अंगाला तेल चोपडायचे. म्हणजे कुणाच्या हातात सापडले तरी निसटून जायला सोपे. ही पद्धत आता अनेक भुरट्यांनीही अंगीकारल्याचे दिसते. सुट्टीच्या दिवसांत या टोळ्या अधिक सक्रिय होतात. या काळात लोक बाहेरगावी जातात. त्यांच्या बंद घरांत हे चोर घुसतात. काही काळासाठी शहरात यायचे. बंद घरे वा बंगले हेरायचे. घरफोडी करायची आणि आपल्या गावाकडे पळायचे, अशी यांची सर्वसाधारण पद्धत असते.

अशी घ्या काळजी...
सुट्टीसाठी गावी जाताना जवळच्या पोलिस ठाण्याला त्याची माहिती द्या. अशा काळात घरात मौल्यवान वस्तू ठेवू नका. सोसायट्यांच्या वॉचमनला सजग राहण्यासाठी सांगा. सोसायट्यांमध्ये सीसीटीव्ही आणि रात्री योग्य प्रकाश राहील अशी व्यवस्था करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com