ठाकरे सरकारचा आणखी एक दणका 'या' अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 मार्च 2020

फडणवीस सरकारने केलेल्या अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या रद्द करण्याचा धडाकाच महाविकास आघाडी सरकारने लावला आहे.

मुंबई - फडणवीस सरकारने केलेल्या अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या रद्द करण्याचा धडाकाच महाविकास आघाडी सरकारने लावला आहे. राज्य कृषि मूल्य आयोग, महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद तसेच राज्यस्तरीय लेखा समितीवरील अशासकीय पदांवरील नियुक्त्या सोमवारी (ता.2) रद्द करण्यात आल्या आहेत. राज्यमंत्रीपदाचा दर्जा असलेले पाशा पटेल, शेखर चरेगांवकर, अॅड. सचिन पटवर्धन यांच्यासह इतर सदस्यांचा नियुक्त्या रद्द केलेल्यांमध्ये समावेश आहे.

वाचा का भडकलेत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

भाजप-शिवसेना युती सरकारच्या कार्यकाळात भाजपने अनेक समित्यांवर अशासकीय सदस्यांची तज्ज्ञ म्हणून वर्णी लावली होती. आता राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यांच्या आमदार आणि नेत्यांच्या मंडळे, महामंडळे आणि समित्यांवर अध्यक्ष आणि सदस्य म्हणून नियुक्त्या करण्यात येणार आहेत. त्यासाठी भाजप सरकारने शासकीय आणि अशासकीय मंडळे, महामंडळे आणि समित्यांवरील अध्यक्ष तसेच सदस्यांच्या नियुक्त्या रद्द करण्याचे आदेश सर्व खात्यांना देण्यात आले होते. विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नियुक्त्या देखील रद्द करण्यात आलेल्या आहेत. भाजप सरकारने केलेल्या सदस्यांच्या नियुक्या रद्द करून तातडीने नव्या नियुक्या करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी दिले होते, त्याची अंमलबजावणी सध्या युद्ध पातळीवर सुरु आहे. यासाठी महाविकास आघाडीच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची मोर्चेबांधणी सुरु आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगांवकर यांच्यासह सहकार परिषदेवरील इतर सदस्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने शासन सोमवारी परिपत्रक जारी केले आहे. नियुक्ती रद्द करण्यात आलेल्यांमध्ये अध्यक्ष शेखर चरेगांवकर (राज्यमंत्री दर्जा), सदस्य दत्तात्रय काशिनाथ कुलकर्णी (उस्मानाबाद), सीताराम बाजी राणे (ठाणे), रामदास त्र्यंबक देवरे (नाशिक), शिवाजी हिंदुराव पाटील (सांगली) संजय भेंडे (नागपूर), दिलीप बाबुराव पतंगे (सोलापूर), नामदेवराव पांडुरंग घाडगे (पुणे), महेंद्र शिवाजी हिरे (नाशिक) यांचा समावेश आहे.

महत्त्वाची बातमी - मुंबईतही कोरोनाचा शिरकाव

राज्य कृषि मूल्य आयोगाचे अध्यक्ष सय्यद पाशा उस्मानसाहब पटेल यांच्यासह शेतकरी प्रतिनिधींची नियुक्ती राज्य सरकारने रद्द केली आहे. कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने याबाबतचा आदेश जारी केला आहे. राज्य कृषि मूल्य आयोगाचे अध्यक्ष सय्यद पाशा उस्मानसाहब पटेल यांच्यासह शेतकरी प्रतिनिधींची नियुक्ती रद्द झाली आहे. यात प्रा. सुहास पांडुरंग पाटील (सोलापूर), अनिल नारायण पाटील (पालघर), प्रशांत पुरुषोत्तम इंगळे (वर्धा),  किशोर देशपांडे (औरंगाबाद), अच्युत रंघनाथ गंगणे (बीड), संपतराव बाळा पाटील (कोल्हापूर), विनायक आप्पासो जाधव (सांगली) शिवनाथ दत्तात्रय जाधव (नाशिक) यांचा यात समावेश आहे.

राज्य मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आलेल्या राज्यस्तरीय लेखा समितीचे अध्यक्ष अॅड. सचिन पटवर्धन यांच्यासह राज्यस्तरीय लेखा समितीचे सदस्यांच्या नियुक्त्या रद्द करण्याचे आदेश जारी केले आहेत. अॅड. सचिन पटवर्धन यांची नियुक्ती 2015 मध्ये करण्यात आली होती. 3वर्षाच्या कालावधी संपल्यानंतर 2018 मध्ये पुन्हा फेरनियुक्ती करण्यात आली होती. रद्द केलेल्या नियुक्त्यांमध्ये जयंत शरदराव कावळे (वर्धा), सुभाष भोववदराव आकरे (गोंदिया), जिजाबा सीताराम पवार (मुंबई), गजानन वासुदेवराव पाथोडे (चंद्रपूर) तुषारकांती डबले (नागपूर) यांचा समावेश आहे. या नियुक्त्या रद्द करण्याबाबतचा आदेश सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने जारी केला आहे.   

web title : Thackeray government canceled this officers Appointments


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thackeray government canceled this officers Appointments