Thane: ठाणे-बेलापूर उड्डाणपूल लवकरच खड्डेमुक्त, प्रश्न कायमस्वरूपी सुटणार..

Thane: ठाणे-बेलापूर उड्डाणपूल लवकरच खड्डेमुक्त, प्रश्न कायमस्वरूपी सुटणार..

वाशी, ता. २३ (बातमीदार) : ठाणे-बेलापूर रोडवरील उड्डाणपूल खड्डेमुक्त करण्यासाठी महापालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत. पुढील वर्षभरात पुलावर काँक्रीटचा मुलामा दिला जाणार आहे. तसेच इतर कामेही केली जाणार आहेत. यामुळे पुढील १५ ते २० वर्षे पूल खड्डेमुक्त राहणार आहे. नवी मुंबईमध्ये २००५ मध्ये सर्वाधिक खड्डे असणाऱ्या रस्त्यांत ठाणे-बेलापूर रोडचा समावेश होता. दहा किलोमीटरचे अंतर पूर्ण करण्यासाठी दोन ते तीन तास लागत होते.

खड्ड्यांची ही समस्या सोडवण्यासाठी महापालिकेने २००७ मध्ये तुर्भे ते दिघादरम्यान रस्त्याचे काँक्रीटीकरण केले. यामुळे पंधरा वर्षांपासून तो खड्डेमुक्त झाला आहे. या रोडवरील वाहतूक वाहतूककोंडी सोडवण्यासाठी सविता केमिकल, तळवली, घणसोली, कोपरखैरणे येथे उड्डाणपूल तयार केले आहेत; मात्र या पुलांवर पावसाळ्यात खड्डे पडून वाहतूककोंडी होत आहे.

त्यामुळे उड्डाणपुलांवर खड्डे पडतात. त्या ठिकाणी विशेष दुरुस्ती करण्यात येणार आहे. समस्या सोडवण्यासाठी महापालिकेने आता पुलांची विशेष दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. यात पाच पुलांवरील डेस्क स्लॅबची दुरुस्ती केली जाणार आहे. आवश्यक त्या ठिकाणी काँक्रीटीकरण केले जाणार आहे; तर शीव-पनवेल महामार्गावरील पुलांवर सार्वजनिक बांधकाम विभागाने आवश्यक तेथे काँक्रीटीकरण केले आहे. त्याच धर्तीवर पुलांची दुरुस्ती केली जाणार आहे. यामुळे पुढील १५ ते २० वर्षे पुलांवर खड्डे पडणार नाहीत, असा दावा केला जात आहे. या कामासाठी महापालिकेने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.


नवी मुंबईमधील उड्डाणपुलांवरील खड्ड्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. ठाणे-बेलापूर रोडवरील पुलांचीही दुरुस्ती केली जाणार असून, त्यामुळे खड्ड्यांचा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल.
- संजय देसाई, शहर अभियंता, नवी मुंबई महापालिका

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com