सचिन वाझेंच्या अडचणीत आणखी वाढ, ठाणे न्यायालयाकडूनही दिलासा नाही

सचिन वाझेंच्या अडचणीत आणखी वाढ, ठाणे न्यायालयाकडूनही दिलासा नाही

मुंबई: मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात वादात अडकलेले पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना एनआयएनं अटक केली आहे. दरम्यान सचिन वाझे यांच्या विरोधात प्रथमदर्शनी पुरावे आहेत, असे निरीक्षण ठाणे न्यायालयाने नोंदविले आहे. वाझे यांना तातडीने दिलासा देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. यावर पुढील सुनावणी १९ मार्च म्हणजेच शुक्रवारी होणार आहे. 

ठाणे न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्या शैलेंद्र तांबे यांनी शुक्रवारी दिलेल्या निकालाची प्रत शनिवारी उपलब्ध झाली आहे. वाझे यांच्यावरील आरोप आणि उपलब्ध माहितीवरुन त्यांची चौकशी होणे आवश्यक आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे. त्यांच्या विरोधात सक्रुतदर्शनी पुरावे दिसत आहेत. त्यामुळे त्यांची पोलिसांकडून चौकशी व्हायला हवी, असे न्यायालयाने म्हटले आहे. 

वाझे यांनी शुक्रवारी न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला आहे. हिरेन मृत्यू प्रकरणात माझा काही संबंध नाही. ज्या दिवशी ही घटना घडली तेव्हा मी दक्षिण मुंबईमध्ये होतो. यासंदर्भात कागदोपत्री, स्टेशन डायरीमध्ये नोंद आहे, असे मी एटीएसला सांगितले आहे. तसेच एटीएसने नोंद केलेल्या फिर्यादीमध्ये कोणाच्याही नावाचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे ही फिर्याद तर्कहीन आणि विना आधार आहे. केवळ मला यामध्ये लक्ष्य करण्यात येत आहे, असा दावा वाझे यांनी केला आहे. या प्रकरणात अटक होण्याच्या शक्यतेमुळे त्यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला आहे.

हिरेन यांच्या पत्नीने ठळकपणे वाझे यांच्यावर आरोप केले आहेत. मात्र या आरोपात तथ्य नाही, मी अनेक वर्षापासून ठाण्यात राहतो आणि त्यांच्याशी परिचित असलो तरी हा काही उद्देश असू शकत नाही, असा बचाव अर्जात केला आहे. केवळ संशयातून हिरेन यांच्या पत्नीने आरोप केले असून या आधारावर कोणाला अटक होऊ शकत नाही, असा दावा वाझे यांनी केला आहे.

मात्र न्यायालयाने हा दावा अमान्य केला. वाझे 27 आणि 28 फेब्रुवारीला मुंबईमध्ये हिरेन यांच्या बरोबर होते असे दिसते. त्यामुळे त्यांच्या पत्नीने केलेल्या आरोपांवर तपास व्हायला हवा, असे न्यायालयाने म्हटले आहे. वाझे यांच्या वर भादंवि 302 (हत्या), 201( पुरावे नष्ट करणे), 120 ब (कटकारस्थान ) असे गंभीर आरोप आहे, असेही न्यायालयाने नमूद केले आहे.

वाझे यांच्या दाव्यानुसार 4 मार्चला दक्षिण मुंबईत होते तर ता. 4- 5 रोजी रात्री ते डोंगरीमध्ये होते जेव्हा या कथित घटना घडल्या. मात्र सोशल मीडिया आणि माध्यमातून अर्धवट आणि कोणतीही शहनिशा न करता माझ्या विरोधात वृत्ते प्रसिद्ध होत आहेत, असा आरोपही केला आहे. मी तपासाला आणि पोलिस अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करत आहे. त्यामुळे माझ्या अटकेची आवश्यकता नाही, म्हणून मला जामीन मंजूर करावा, अशी मागणी त्यांच्या वतीने एड ए एम कालेकर यांनी केली. 

राज्य सरकारकडून या जामीनाला विरोध करण्यात आला आहे. तपास महत्त्वाचे टप्प्यात असून जामीन मंजूर करू नये, असा युक्तिवाद एड विवेक कडू यांनी केला. 19 मार्चला यावर पुढील सुनावणी होणार आहे. एटीएसने यावर लेखी भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईमधील निवासस्थानाबाहेर 25 फेब्रुवारीला स्फोटके आणि धमकीचे पत्र असलेली स्कॉर्पिओ कार सापडली होती. ही कार हिरेन यांच्या ताब्यात होती. पण त्याआधी आठवडाभर ती चोरीला गेली होती. विशेष म्हणजे त्यानंतर दिड आठवड्यात हिरेन यांचा मृतदेह ठाणे खाडीमध्ये आढळला होता. 

हिरेन यांनी वाझे यांना कार नोव्हेंबरमध्ये वापरण्यासाठी  दिली होती. जी त्यांनी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात परत केली होती, असे हिरन यांच्या पत्नीने सांगितले आहे. मात्र या दाव्याचे खंडन वाझे यांनी एटीएसला केले आहे.

------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Thane court has refused grant immediate relief Sachin Waze

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com