एकनाथ शिंदे ऑन फिल्ड; PPE कीट घालून थेट कोविड वॉर्डमध्ये

पूजा विचारे
Saturday, 22 August 2020

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे पीपीई कीट घालून थेट कोविड वॉर्डमध्ये दाखल झाले. कल्याणमध्ये जाऊन त्यांनी कोरोनाबाधित रुग्णांच्या जवळ जाऊन त्यांची विचारपूस केली. तसंच त्यांना बरं होण्यासाठी शुभेच्छाही दिल्या. 

मुंबईः कोरोना व्हायरसनं सर्वत्र थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढताना दिसतोय. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. मुंबई जरी कोरोना नियंत्रणात येत असला तरी ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली या भागात कोरोनाचा प्रार्दुभाव अजूनही कायम आहे. असं असतानाही ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे पीपीई कीट घालून थेट कोविड वॉर्डमध्ये दाखल झाले. कल्याणमध्ये जाऊन त्यांनी कोरोनाबाधित रुग्णांच्या जवळ जाऊन त्यांची विचारपूस केली. तसंच त्यांना बरं होण्यासाठी शुभेच्छाही दिल्या. 

सध्या केडीएमसीचे नगरसेवक राजेंद्र देवळेकर आणि महानगर प्रमुख विजय साळवी यांना अशाच प्रकारे कोरोनाची लागण झाली आहे. विजय साळवी यांच्यावर कल्याणच्या मीरा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यामुळे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजय साळवी यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. मीरा हॉस्पिटलमध्ये त्यांनी पीपीई किट घातलं आणि थेट विजय साळवी उपचार घेत असलेल्या वॉर्डात गेले. 

यावेळी एकनाथ शिंदे यांनी त्यांना मिळणाऱ्या उपचाराची डॉक्टरांकडून माहिती घेतली. यावेळी त्यांनी तब्येत कशी आहे? काही त्रास होतो का? अशी साळवी यांना विचारपूस केली. तुम्ही लवकर बरे होणार आहात, काळजी करु नका असं म्हणत धीर दिला. तुम्ही आराम करा, दुसऱ्या रुग्णालयात शिफ्ट व्हायचं का? असंही विचारलं. त्यावर साळवी यांनी नकार दिला.

हेही वाचाः  मतदानासाठी PPE कीट घालून मनसे महिला सदस्य कोविड सेंटरमधून थेट ग्रामपंचायत कार्यालयात

तसंच पालकमंत्र्यांनी साळवी यांच्या खांद्यावर हात ठेवत तू आता बरा होत आला आहे. मी डॉक्टरांशी बोललो. तुझी प्रकृती ठिक होत असून लवकरच तुला डिस्चार्जही मिळेल, असा धीर देण्याचा प्रयत्न केला. साळवी यांनी आपल्या कुटुंबाविषयी काळजी व्यक्त केली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मी स्वतः त्यांची भेट घेतो, असं आश्वासन दिलं.

अधिक वाचाः  गणेश चतुर्थीदिवशीही मुंबईत पावसाचा जोर कायम, येत्या २१ तारखेपर्यंत कसा असेल पाऊस, वाचा सविस्तर

कल्याण डोंबिवली महानगर पालिकेत कोरोनाने थैमान घातलं आहे. दरम्यान कल्याण डोंबिवलीत बरे होणाऱ्यांचं प्रमाण (रिकव्हरी रेट) ८५ टक्के आहे. मात्र, येथे आतापर्यंत ५३८ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक म्हणजे मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांमध्ये अनेक जण शिवसैनिक आहेत. त्यांनी कोरोनाच्या काळात पुढे बरंच समाजकार्य केलं होतं.

Thane Guardian minister eknath shinde meet shivsena activist corona ward ppe kit kalyan


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thane Guardian minister eknath shinde meet shivsena activist corona ward ppe kit kalyan