फेरीवाल्यांच्या म्होरक्‍यांच्या मागे पोलिसांचा ससेमिरा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 मे 2017

ठाणे -  ठाणे रेल्वेस्थानक परिसरातील सॅटीस पुलाखाली फेरीवाल्यांचा वाढता उपद्रव आणि त्यांच्यावर वारंवार कारवाई करूनही त्यांची साखळी तोडण्यात येणारे अपयश लक्षात घेऊन ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांची भेट घेऊन फेरीवाल्यांच्या म्होरक्‍यांवर कारवाई करण्याविषयी चर्चा केली. आता फेरीवाल्यांची साखळी चालवणाऱ्या म्होरक्‍यांच्या मागे पोलिसांचा ससेमिरा लागण्याची शक्‍यता आहे.

ठाणे -  ठाणे रेल्वेस्थानक परिसरातील सॅटीस पुलाखाली फेरीवाल्यांचा वाढता उपद्रव आणि त्यांच्यावर वारंवार कारवाई करूनही त्यांची साखळी तोडण्यात येणारे अपयश लक्षात घेऊन ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांची भेट घेऊन फेरीवाल्यांच्या म्होरक्‍यांवर कारवाई करण्याविषयी चर्चा केली. आता फेरीवाल्यांची साखळी चालवणाऱ्या म्होरक्‍यांच्या मागे पोलिसांचा ससेमिरा लागण्याची शक्‍यता आहे. पालिका आयुक्तांनी पोलिस आयुक्तांना याविषयी कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सहकार्याची विनंती केली असून पोलिस आयुक्तांनीही पोलिस यंत्रणांच्या साह्याने या समस्येच्या मुळाशी जाऊन कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले आहे. त्यामुळे फेरीवाल्यांना अभय देणाऱ्या महापालिका अधिकारी कर्मचाऱ्यांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत सगळ्यांच्या पाठीमागे पोलिसांचा ससेमिरा लागण्याची शक्‍यता आहे. 

ठाण्यातील फेरीवाल्यांची समस्या उग्र होत असताना त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पालिका उपायुक्तांना मारहाण करण्यापर्यंत या फेरीवाल्यांचे धाडस वाढले आहे. ठाणे सॅटीस परिसर ना फेरीवाला क्षेत्र असूनही या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फेरीवाले दाखल होत आहेत. महापालिका आयुक्तांनी सलग सात दिवस रस्त्यावर उतरून त्यांच्या विरोधात कडक कारवाई करूनही फेरीवाले पुन्हा सॅटीसखाली हजर होण्यास सुरुवात झाली आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पालिका झालेल्या बैठकीस पोलिस आयुक्त मधुकर पाण्डेय, अतिरिक्त आयुक्त सत्य नारायण यांच्यासह वाहतूक पोलिस उपायुक्त संदीप पालवे, महापालिका उपायुक्त संदीप माळवी, अशोक बुरपुल्ले, सहायक आयुक्त मारुती गायकवाड उपस्थित होते. 

बैठकीतील महत्त्वाच्या चर्चा... 
फेरीवाल्यांचे कायमस्वरूपी नियमन करणे. 
बेकायदा रिक्षा पार्क करणाऱ्या रिक्षावाल्यांना शिस्त लावणे. 
बेकायदा फेरीवाल्यांना संरक्षण देणाऱ्या तथाकथित म्होरक्‍यांवर कायदेशीर कारवाई करणे. 
कारवाईसाठी संयुक्त पथक स्थापन करणे. 
विशेष पथकाच्या कारवाईदरम्यान वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित राहणे. 
फेरीवाला क्षेत्र आणि रिक्षा स्टॅंडची संख्या वाढवण्यासाठी जागेची पाहणी करणे. 
स्टेशन परिसरात उच्च प्रतीचे सीसी टीव्ही कॅमेरे बसवणे. 

Web Title: Thane - Hawker zone