सगळीकडे शुकशुकाट; मात्र, या ठिकाणच्या बाजारात तुडुंब गर्दी

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 21 March 2020

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्या (ता.22) नागरिकांना "जनता कर्फ्यू'चे पालन करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे नागरिकांनी गृहोपयोगी वस्तू आणि भाजीपाल्याची बेगमी करून ठेवण्यासाठी ठाण्याच्या बाजारपेठेत आज तुडुंब गर्दी केल्याचे दिसून आले.

ठाणे : कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्या (ता.22) नागरिकांना "जनता कर्फ्यू'चे पालन करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे नागरिकांनी गृहोपयोगी वस्तू आणि भाजीपाल्याची बेगमी करून ठेवण्यासाठी ठाण्याच्या बाजारपेठेत आज तुडुंब गर्दी केल्याचे दिसून आले. जांभळी नाक्‍यावरील भाजी मंडईमध्ये तर आबालवृद्धांची अक्षरशः झुंबड उडाली होती. 

ही बातमी वाचली का? संजय राऊत म्हणतात, त्या सगळ्यांना क्वारंटाईन करा...

देशभरात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे वातावरण गंभीर बनले आहे. खबरदारी म्हणून राज्य सरकारकडून महत्त्वाची शहरे लॉकडाऊन करण्यात आली आहेत; तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांशी संवाद साधून, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर 22 मार्च अर्थात रविवारी सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत नागरिकांना घरातच थांबून "जनता कर्फ्यू'मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. तसेच जीवनावश्‍यक वस्तूंवर कोणतेही निर्बंध असणार नसल्याचे स्पष्ट करून नागरिकांनी या वस्तूंचा साठा न करण्याचे बजावले होते. मात्र, तरीही "जनता कर्फ्यू'मुळे धास्तावलेल्या नागरिकांनी शनिवारी संसारोपयोगी वस्तूंसह धान्य-कडधान्य आणि भाजीपाल्याची बेगमी करण्यासाठी ठाण्याच्या बाजारपेठेत आणि भाजी मंडईमध्ये गर्दी केली होती. नागरिक आठवडाभर पुरेल इतका भाजीपाल्याचा साठा करीत असल्याचे दिसून आले. दरम्यान, एकीकडे कोरोनामुळे गर्दी टाळण्याबाबत प्रशासन खबरदारी घेत असताना, नागरिक मात्र सर्व नियम धाब्यावर बसवून खरेदीसाठी गर्दी करीत असल्याने सर्वत्र चिंता व्यक्त करण्यात येत आहे. 

हेही वाचा - येथे रेल्वे कर्र्मचारीचं करतात, दररोज कायद्याचे उल्लंघन

सुरक्षिततेच्या सूचनेला हरताळ 
गर्दी टाळण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील सर्व दुकाने व आस्थापना, किराणा सामान, दूध व भाजीपाला व अन्य जीवनावश्‍यक वस्तू व औषधालय वगळून 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच किराणामालाची दुकाने, औषधालय, दुधाची व भाजीपाला आणि जीवनावश्‍यक वस्तूंच्या दुकानांमध्ये आवश्‍यक स्वच्छता ठेवण्यासह ग्राहकांसाठी हॅण्डवॉश, सॅनिटायझर उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिल्या होत्या. तरीही जिल्हाधिकाऱ्यांच्या या सूचनेला बहुतांश दुकानदारांनी हरताळ फासल्याचे दिसून आले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thane market crowds fluctuate on Janata curfew