

ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीच्या रणसंग्रामात महायुती आणि महाविकास आघाडीतील बंडखोरांना शांत करण्यात नेत्यांना यश आले असले, तरी ८६ अपक्ष उमेदवारांनी राजकीय पक्षांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. ३३ प्रभागांतील चुरस आता या अपक्ष उमेदवारांच्या भूमिकेवर अवलंबून असणार आहे. १३१ जागांसाठी झालेल्या वाटपात अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलण्यात आले. चार-पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आलेली निवडणूक आणि इच्छुकांची प्रचंड गर्दी यामुळे बंडखोरी उफाळून आली होती. नेत्यांनी डॅमेज कंट्रोल करीत ९० टक्के बंडखोरांचे अर्ज मागे घेण्यात यश मिळवले असले, तरी काही ठिकाणी बंडखोर अपक्ष म्हणून लढण्यावर ठाम आहेत.