ठाणे महापालिकेचा फलक धुळीला 

शर्मिला वाळुंज
गुरुवार, 10 मे 2018

ठाणे - ठाणे महापालिकेचा कर भरण्यास वर्षानुवर्षे असहकार दाखवणाऱ्या थकबाकीदारांना वठणीवर आणण्यासाठी महापालिकातर्फे थकबाकीदारांची यादी सार्वजनिक चौकात लावण्यात येते. गेली दोन वर्षे महापालिका अशा स्वरूपाची मोहीम राबवून थकबाकीदारांना वठणीवर आणण्याचा प्रयत्न करत आहे; मात्र सध्या हे फलक धुळीला मिळाले आहेत. फलक फाटून रस्त्यावर पडले असून, महापालिकेचेच या फलकांकडे दुर्लक्ष झाल्याने कालांतराने थकबाकीदारांनाही या फलकांचे काही भय राहणार नाही, असेच दिसत आहे. 

मालमत्ता कर आणि पाणीबिलांच्या वसुलीसाठी ठाणे महापालिका प्रशासन यापूर्वी थकबाकीदारांच्या नावांची यादी वृत्तपत्रात प्रसिद्ध करत होते; मात्र दोन वर्षांपासून महापालिकेने थकबाकीदारांविरोधात कडक मोहीम हाती घेतली आहे. थकबाकीदारांच्या घरी बॅंडबाजा नेण्याच्या मोहिमेसह थकबाकीदारांची यादीही सार्वजनिक चौकात झळकवून महापालिका त्यांना जागे करण्याचा प्रयत्न करत आहे. या फलकांवर मालमत्ता क्रमांक, थकबाकीदाराचे नाव, पत्ता, थकीत कराची रक्कम आदी माहिती नमूद करण्यात आलेली आहे. हे फलक महापालिकेने शहरातील चौका-चौकात लावलेले आहेत. प्रभाग समितीनुसार थकबाकीदारांची यादी शहरातील सार्वजनिक ठिकाणी लावत महापालिकेने थकबाकीदारांचे वाभाडे काढण्याचाच प्रयत्न केला आहे; मात्र हे फलकच सध्या महापालिकेचे वाभाडे काढत आहेत. हवेमुळे काही फलक फाटून खाली पडले आहेत. 

रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना या पडलेल्या फलकांमुळे अडथळा निर्माण होत असल्याचे चित्र नौपाडा येथील फलकावरून दिसत आहे. दोन-तीन दिवस रस्त्यावर पडलेला फलक अखेर काही जागरूक नागरिकांनीच एका बंद दुकानाच्या बाजूला नेऊन ठेवला. या बाजूला ठेवलेल्या फलकाकडेही महापालिकेचे लक्ष अद्याप गेलेले नाही. दोन दिवस हा फलक येथेच पडून आहे. फलकांची ही अवस्था असल्याने थकबाकीदारांनाही त्याचा वचक कितपत राहील, याबाबत शंकाच आहे. 

गेली सात ते आठ दिवस हा फलक खाली पडलेला आहे. फूटपाथवरून चालणाऱ्या नागरिकांना त्याचा अडथळा निर्माण होत असल्याने अखेर तो फलक बाजूला उचलून ठेवला. महापालिका अनेक चांगले उपक्रम शहरात राबवते; मात्र त्यात सातत्य ठेवणे किंवा त्याची अंमलबजावणी करणे आवश्‍यक आहे. महापालिका कर्मचाऱ्यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. महापालिकेची घंटागाडी येथे येते; परंतु त्यांनाही महापालिकेस या फलकाविषयी सांगणे गरजेचे वाटले नाही. 
- प्रशांत पराडकर, नागरिक 

याविषयी ठाणे महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही. 

Web Title: thane Municipal corporation List of defaulters Panel