ठाणे महापालिकेला आता क्रिकेटचे वेध 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 मार्च 2020

ठाण्यात क्रीडापटू तयार व्हावेत, तसेच खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे यासाठी कबड्डी आणि खो खो या संघांनंतर ठाणे महापालिकेला आता क्रिकेट संघाचे वेध लागले आहेत.

ठाणे : ठाण्यात क्रीडापटू तयार व्हावेत, तसेच खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे यासाठी कबड्डी आणि खो खो या संघांनंतर ठाणे महापालिकेला आता क्रिकेट संघाचे वेध लागले आहेत. त्यासाठी महापालिकेने व्यावसायिक पुरुष क्रिकेट संघ तयार करण्यात येत असून येत्या सर्वसाधारण सभेत या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होणार आहे. 16 खेळाडू, संघ व्यवस्थापक, प्रशिक्षक आणि वैद्यकीय सल्लागार यांची मानधनावर नियुक्ती करण्यात येणार असून त्यासाठी एकूण 79 लाख 20 हजारांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. 

ठाणे महापालिका दरवर्षी महापौर चषक स्पर्धा आयोजित करत असल्याने विविध क्रीडा प्रकार आणि खेळाडूंसाठी उत्तम व्यासपीठ मिळते; तर क्रिकेटचे ग्लॅमर असल्याने रणजी क्रिकेट स्पर्धांच्या आयोजनासाठी कोट्यवधींचा खर्च ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममधील खेळपट्टी आणि सुविधांवर केला आहे. या पार्श्‍वभूमीवर ठाणे महापालिकेचा क्रिकेटचा संघ निर्माण करण्याच्या प्रक्रियेलाही सुरुवात करण्यात आली आहे. खेळाडू, प्रशिक्षक, व्यवस्थापक आणि वैद्यकीय सल्लागार अशांची नियुक्ती करून संघ तयार करण्यात येणार आहे.

ही बातमी वाचा ः  कोरोनाच्या पार्श्वभुमिवर डी- मार्ट बाबत महत्त्वाची बातमी

त्यासाठी खेळाडूंचे निरीक्षण व चाचण्या घेऊन त्यांचा संघात समावेश करण्यात येणार आहे. 19, 23 आणि 25 वर्षांखालील क्रिकेट संघामध्ये खेळलेले, मुंबई क्रिकेट असोसिएशन किंवा मुंबई विद्यापीठाकडून प्रतिनिधित्व केलेले खेळाडू या निवड चाचणीसाठी पात्र ठरणार आहेत. त्याचबरोबर मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अ किंवा ब गटाकडून दोन वर्षे खेळलेल्या खेळाडूंनाही या संघात पात्र ठरवले जाणार आहे. या संघनिवडीसाठी क्रिकेटचे सामने खेळवण्यात येणार असून त्यातून अंतिम संघ तयार करण्यात येणार आहे. ठाणे महापालिका आयुक्त, क्रीडा उपायुक्त, क्रीडा अधिकारी आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले खेळाडू किंवा रणजी क्रिकेट खेळलेले खेळाडू या क्रिकेट संघाच्या कार्यकारिणी समितीवर असणार आहेत. 

क्रिकेटपटूंनाही मानधन 
ठाणे महापालिकेकडून तयार करण्यात आलेल्या कबड्डी संघाच्या धर्तीवर क्रिकेट संघातील खेळाडूंशी करार केला जाणार असून त्याप्रमाणे मानधन दिले जाणार आहे. 16 खेळाडू, 1 संघ व्यवस्थापक आणि प्रशिक्षक यांना प्रतिमहा 15 हजार रुपये देऊन करारबद्ध करण्यात येणार आहे; तर वैद्यकीय सल्लागारास प्रतिमहा पाच हजार रुपये देण्यात येणार आहेत. क्रिकेट खेळाचे साहित्य घेण्यासाठी दोन लाख, स्पर्धेच्या कालावधीत संघाच्या इतर खर्चासाठी चार लाख 60 हजार रुपये असा एकूण वार्षिक खर्च 39 लाख 60 हजार रुपये येणार असून दोन वर्षांसाठी 79 लाख 20 हजारांचा खर्च अपेक्षित करण्यात आला आहे. यासह क्रिकेटच्या स्पर्धांसाठी प्रायोजक घेण्याचा पर्यायदेखील खुला ठेवला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thane municipal corporation now a cricket observatory