ठाणे महापालिकेचा भोंगळ कारभार; कोरोनामुक्त रुग्णाला दाखवले पुन्हा पॉझिटीव्ह

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 24 May 2020

कोरोनाच्या बाबतीत ठाणे महानगर पालिकेच्या आरोग्य खात्यामध्ये ताळमेळ नसल्याचे अनेकदा उघडकीस आलेले असतानाच आता आणखी एक प्रताप उघडकीस आला आहे.

ठाणे : कोरोनाच्या बाबतीत ठाणे महानगर पालिकेच्या आरोग्य खात्यामध्ये ताळमेळ नसल्याचे अनेकदा उघडकीस आलेले असतानाच आता आणखी एक प्रताप उघडकीस आला आहे. कोरोनावर मात करुन 12 मे रोजी घरी परतलेल्या व्यक्तीला चक्क 23 मे रोजीच्या यादीमध्ये पॉझिटीव्ह दाखविण्याचा विचित्र प्रकार घडला आहे.

मोठी बातमी ः कोरोना नियंत्रणासाठी धारावीत जम्बो क्वारंटाईन सेंटर; किती खाटा असणार आहेत?

एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी असलेल्या या व्यक्तीला 17 एप्रिल रोजी केलेल्या तपासणीमध्ये कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर या रुग्णास कौशल्य रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, तेथे रुग्णसंख्या वाढू लागल्याने या रुग्णाने नंतर सफायर रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला होता. कोरोनावर पूर्ण मात केल्यानंतर या रुग्णाला 12 मे रोजी घरी सोडले, तसेच होम क्वारंटाईन राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. पूर्णपणे कोरनामुक्त झालेला ही व्यक्ती खोपट येथील आपल्या निवासस्थानी राहात आहे. 

मोठी बातमी ः ...म्हणून म्हाडाच्या रखडलेल्या प्रकल्पांना देण्यात आली परवानगी!

मात्र, त्यानंतर ठाणे पालिकेने शनिवारी जाहीर केलेल्या यादीमध्ये 107 व्या क्रमांकावर या रुग्णाचे नाव त्याच्या राहत्या पत्त्यासह प्रसिद्ध केले. विशेष म्हणजे, ही यादी काही ठिकाणी प्रसिद्ध झाल्यानंतर त्या रुग्णाला अनेकांचे फोन आले. तसेच, हा रुग्ण राहात असलेल्या इमारतीमधील लोकही त्यांच्याकडे संशयाने पाहू लागले होते.

मोठी बातमी ठाणे जिल्ह्यातील 'हे' योद्धे कोरोनाच्या विळख्यात; विशेष कक्षही केला तयार

अधिकाऱ्यांकडून अपेक्षित उत्तर नाही
या रुग्णाने पालिकेच्या अधिकाऱ्यांना फोन केल्यानंतरही त्यांच्याकडून त्यांना अपेक्षित उत्तरे मिळाली नाहीत. या प्रकरणात आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजीत पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे, पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड, ठामपा आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचे सदर कोरोनामुक्त व्यक्तीने सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: thane municipal corporation shows corona free patients again corona