ठाण्यात फेरीवाल्यांवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 मार्च 2018

ठाणे महापालिकेद्वारे फेरीवाल्यांवर कारवाई सुरू असतानाच आता रस्ते, पदपथ अडवणाऱ्या फेरीवाल्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यास सुरवात केली आहे.

ठाणे : ठाणे महापालिकेद्वारे फेरीवाल्यांवर कारवाई सुरू असतानाच आता रस्ते, पदपथ अडवणाऱ्या फेरीवाल्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यास सुरवात केली आहे. शहरातील सार्वजनिक रस्त्यावर व्यवसायाची पथारी पसरून पादचाऱ्यांना आणि वाहनांच्या रहदारीला अडथळा निर्माण करणाऱ्या दोघा फेरीवाल्यांवर नौपाडा पोलिसांनी, तर बाजारपेठेतील एका फेरीवाल्यावर ठाणेनगर पोलिसांनी कारवाई करीत गुन्हे नोंदवले आहेत. ही कारवाई शुक्रवारी करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. 

चिंतामणी ज्वेलर्सनजीक अनधिकृतपणे रस्त्याच्या कडेला लाकडी बाकडे लावून व्यवसाय करणाऱ्या फेरीवाला कृष्णप्रसाद प्रजापती (38) यांच्यासह राममारुती रोडवरील एकमार्गी रस्त्यावर बेकायदा पथारी पसरून व्यवसाय करणाऱ्या मनजितकुमार प्रजापती (22) यांच्या विरोधात नौपाडा पोलिसांनी कारवाई केली. तिसरा गुन्हा शुक्रवारी ठाणेनगर पोलिस ठाण्याचे पोलिस शिपाई मेहेंद्र शेळके यांनी केली. बाजारपेठेतील ए वन फर्निचरसमोर इमिटेशन ज्वेलरीचे अनधिकृतपणे दुकान थाटून वाहतुकीस आणि पादचाऱ्यांना अडथळा निर्माण केल्याप्रकरणी फेरीवाला अनिल वाघेला यांच्या विरोधात ठाणेनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thane Municipal taken Action aginst Hawkers