esakal | ठाणे पालिका प्रभाग समितीतील १७० जणांच्या बदल्या | Thane Municipal
sakal

बोलून बातमी शोधा

Thane Municipal corporation

ठाणे पालिका प्रभाग समितीतील १७० जणांच्या बदल्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ठाणे : महापालिका क्षेत्रात (thane municipal) गेल्या दोन महिन्यांपासून अनधिकृत बांधकामांचा (illegal construction) मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या बांधकामांवरून पालिका प्रशासनावर करण्यात येत असलेलेल्या टीकेची दखल घेत पालिकेच्या सहायक आयुक्तांना नोटिसा (notice) बजाविल्या आहेत. त्यापाठोपाठ आता प्रभाग समितीत वर्षानुवर्षे तळ ठोकून बसलेल्या १७० कर्मचाऱ्यांच्या बदल्या (Employee transfer) केल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक अतिक्रमण विभागात कार्यरत ८५ कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा: मुंबई : रेव्ह पार्टीशी संबंध नसल्यानेच त्यांना सोडले; ‘NCB’चा खुलासा

ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोनादरम्यान उभ्या राहिलेल्या अनधिकृत बांधकामांवरून विरोधकांनी रान उठविले होते. त्यात स्थायी समितीच्या बैठका असो अथवा सर्वसाधारण सभा या दोन्ही सभागृहांत सदस्यांकडून हा मुद्दा चर्चिला जात होता. त्यामुळे पालिका आयुक्तांनी शहरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा बडगा उगारला. आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी कर्मचाऱ्यांपासून ते अधिकाऱ्यांपर्यंत बदलीचे हत्यार उपसले आहे.

ठाणे महापालिकेच्या विविध नऊ प्रभाग समित्यांतील तब्बल १७० कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये अतिक्रमण विभागात कार्यरत तब्बल ८५ कर्मचाऱ्यांच्याच म्हणजेच १०० टक्के बदल्या केल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामांच्या मुद्द्यावरून या बदल्या केल्याची माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा: मुंबई : पेंग्विन, वाघोबाचे दर्शन कधी होणार? राणीची बाग अजूनही बंद

...अन्यथा शिस्तभंगाची कारवाई

नऊ प्रभाग समितीत कार्यरत बिगारी, सफाई कामगार, लिपिक, करवसुली विभाग, बीट निरीक्षक, मुकादम, शिपाई अशा सर्वांच्या बदल्या केल्या आहेत. या कर्मचाऱ्यांना आता सोमवारपासून आपल्या बदलीच्या ठिकाणी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. जे कर्मचारी हजर राहणार नाहीत, त्यांची सेवा विनावेतन धरण्यात येऊन त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला आहे.

१६ अधिकाऱ्यांना बढती

महापालिकेच्या प्रभाग समितीतील कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या केल्यानंतर आता १६ अधिकाऱ्यांना पदोन्नती दिल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. मागील वर्षभर पद्दोन्नती देण्यात येऊनही अधिकाऱ्यांना नियुक्ती दिली नव्हती. कोरोनाचा कालावधी असल्याने या अधिकाऱ्यांची नियुक्ती रखडली होती. त्यामुळे नियुक्ती मिळावी यासाठी अधिकाऱ्यांनी पालिकेकडे पत्रव्यवहार केला होता. त्यात आता कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागल्याने पालिकेने १६ अधिकाऱ्यांना पदोन्नती देताना त्यांची रखडलेली नियुक्तीही त्यांना दिली आहे. त्यासंदर्भातील आदेश शनिवारी काढले आहेत. त्यानुसार नियुक्ती मिळालेल्या अधिकाऱ्यांना संबंधित ठिकाणी सोमवारपासून हजर व्हावे, असेही आदेशात नमूद केले आहे.

loading image
go to top