esakal | नवमतदार नोंदणी मोहीम यशस्वीपणे राबवू; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती | Thane municipal
sakal

बोलून बातमी शोधा

Thane Municipal corporation

नवमतदार नोंदणी मोहीम यशस्वीपणे राबवू; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ठाणे : ठाणे जिल्ह्यात (Thane) आगामी वर्षांत होऊ घातलेल्या महापालिका (municipal), तसेच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी निर्दोष मतदार यादी (voters list) करण्याचे काम जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. जिल्ह्यातील महापालिकांच्या समन्वयातून मतदार याद्या अद्ययावतीकरण आणि नवमतदार नोंदणी मोहीम (Voters registration scheme) यशस्वीपणे राबवू, अशी ग्वाही जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर (rajesh narvekar) यांनी दिली.

हेही वाचा: कुलाबा सीप्झ मेट्रोची चाचणी; मरोळ-मरोशी येथे भुयारी मार्गाच्या ठिकाणी

राज्य निवडणूक आयोग आणि राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी आज संयुक्तपणे सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांची दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून बैठक घेतली. त्यावेळी ठाणे जिल्ह्यातील मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाविषयी माहिती देताना जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर बोलत होते.

ठाणे जिल्ह्यात आगामी काळात सहा महापालिका, दोन अ वर्ग नगरपालिका, २ नगरपंचायत यांच्या निवडणुका होतील. त्यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणेला सर्व महापालिकांचे सहकार्य अपेक्षित आहे. जिल्ह्यात सुमारे ८ लाख मतदार असे आहेत ज्यांचे मतदार यादीत नाव आहे, मात्र छायाचित्र नाही. त्यामुळे अशा मतदारांची चौकशी करून त्यांची नावे वगळण्याची कार्यवाही सुरू आहे. आतापर्यंत ३ लाख ६० हजार नावे यादीतून वगळण्यात आली असून बीएलओकडून पंचनाम्यांची कार्यवाही सुरू आहे.

हेही वाचा: प्रकृतीच्या कारणास्तव शिवलीला पाटील 'बिग बॉस'च्या घराबाहेर

या कामासाठी बीएलओंची भूमिका महत्त्वाची असून ज्यांची बीएलओ म्हणून नेमणूक झाली आहे अशा कर्मचाऱ्यांना महापालिकांनी तातडीने कार्यमुक्त करावे, अशी मागणी जिल्हाधिकारी श्री. नार्वेकर यांनी केली. दरम्यान, या बैठकीनंतर जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी तातडीने महापालिकेच्या उपायुक्तांची बैठक घेतली. १ ऑक्टोबरपासून अतिरिक्त सहायक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी मतदार याद्यांच्या अद्ययावतीकरणाच्या कामासाठी मिशन मोडवर काम करावे. निर्दोष मतदार यादी आगामी निवडणुकासाठी महत्त्वाची असून सर्वांनी कामाला लागा, असे निर्देश नार्वेकर यांनी यावेळी दिले.

नोव्हेंबरमध्ये नोंदणी

१ जानेवारी २०२२ जे वयाची १८ वर्षे पूर्ण करतील अशांना १ ते ३० नोव्हेंबर २०२१ या कालावधीत नवमतदार नोंदणी करता येणार आहे. त्यासाठी शैक्षणिक संस्थांची मदत घेतानाच जनजागृतीसाठी विविध माध्यमांचा वापर करावा, असे आवाहन नार्वेकर यांनी केले. बैठकीस सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे, जिल्हा उपनिवडणूक अधिकारी अर्चना कदम, ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर, भिवंडी येथील महापालिकांचे उपायुक्त उपस्थित होते.

loading image
go to top