ठाणे पालिकेत सत्ताधारी, प्रशासन आमने-सामने 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 फेब्रुवारी 2020

ठाणे पालिकेत बऱ्याच काळानंतर उपायुक्तांच्या विभागांमध्ये फेरबदल करण्यात आलेले आहेत; पण या फेरबदलांमध्ये सत्ताधारी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना विश्वासात न घेतल्याच्या मुद्द्यावरून वाद सुरू झाल्याचे कळते. शुक्रवारी या फेरबदलाचे आदेश निघाले असले, तरी त्याची अंमलबजावणी नक्की कधीपासून होणार, हे पुढील दोन दिवसांनंतर स्पष्ट होणार असल्याची माहिती महापालिकेतील वरिष्ठ सूत्रांनी दिली. 

ठाणे : ठाणे पालिकेत बऱ्याच काळानंतर उपायुक्तांच्या विभागांमध्ये फेरबदल करण्यात आलेले आहेत; पण या फेरबदलांमध्ये सत्ताधारी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना विश्वासात न घेतल्याच्या मुद्द्यावरून वाद सुरू झाल्याचे कळते. शुक्रवारी या फेरबदलाचे आदेश निघाले असले, तरी त्याची अंमलबजावणी नक्की कधीपासून होणार, हे पुढील दोन दिवसांनंतर स्पष्ट होणार असल्याची माहिती महापालिकेतील वरिष्ठ सूत्रांनी दिली. 

महापालिकेत सत्ताधाऱ्यांसाठी पालिकेचे सचिवपद महत्त्वाचे समजले जाते. सचिवांच्या माध्यमातूनच सर्वसाधारण सभा अथवा इतर कामकाज चालते; मात्र याच सचिवपदावर शिक्षण मंडळात वारंवार वादग्रस्त प्रस्ताव सादर करणारे पालिका उपायुक्त मनीष जोशी यांना आणल्याने शिवसेनेच्या गोटात नाराजी पसरली आहे. यापूर्वी सचिवपदाचा अतिरिक्त कारभार अतिक्रमण विभागाचे उपायुक्त अशोक बुरपुल्ले यांच्याकडे होता; पण त्यांच्याकडून हा पदभार काढून मनीष जोशी यांना देण्यात आल्याने शिवसेनेच्या नेत्यांनी आपली नाराजी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे व्यक्त केल्याचे कळते. 

शिक्षण मंडळाला विश्वासात न घेता वादग्रस्त प्रस्ताव सभेत आणण्यासाठी मनीष जोशी प्रसिद्ध होते. त्यांच्याकडून आता शिक्षण विभागाचा कार्यभार काढून घेण्यात आला आहे. त्यांच्याकडे घनकचरा विभाग, घनकचरा प्रकल्प, जिद्द शाळा, महापालिका सचिव (अतिरिक्त कार्यभार) आदी पदभार सोपविण्यात आला आहे. पालिकेच्या उपायुक्त व सहायक आयुक्तांच्या जबाबदाऱ्यांमध्येही फेरबदल करण्यात आले आहेत.

हॉटेलांसाठी अग्निसुरक्षा अध्यादेश आहे का? उच्च न्यायालयाचा सवाल

नौपाडा कोपरी प्रभाग समितीचे सहायक आयुक्त मारुती गायकवाड यांची मुंब्रा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्तपदी; तर शंकर पाटोळे यांची उथळसर येथून नौपाडा, कोपरी प्रभाग समितीच्या सहायक आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. प्रणाली घोंगे यांची सामान्य प्रशासन विभागातून उथळसर प्रभाग समितीच्या सहायक आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. 

सहा. आयुक्त महेश आहेर यांना मुंब्रा प्रभाग समितीमधून आता वागळे प्रभाग समितीच्या सहायक आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्याकडील स्थावर मालमत्ता व्यवस्थापकपदाचा कार्यभार वागळे प्रभाग समितीचे सहायक आयुक्त विजय जाधव यांच्याकडे देण्यात आला आहे.

आगीच्या दुर्घटना टाळण्यासाठी उद्योगांनी प्रशिक्षित कर्मचारी नेमावेत

परिवहन व्यवस्थापकपदाची अतिरिक्त जबाबदारी दिलेले संदीप माळवी यांची यांच्याकडे पुन्हा माहिती व जनसंपर्क, परवाना, क्रीडा व सांस्कृतिक, आपत्ती व्यवस्थापन, जाहिरात, चिंतामणराव देशमुख संस्था आणि अभिलेख कक्ष यांची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्याकडील परिवहनचा अतिरिक्त कार्यभार आता अशोक बुरपुल्ले यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. कार्मिक विभागाच्या वर्षा दीक्षित यांना आता परिमंडळ- 3 ची जबाबदारी देण्यात आली आहे. 

सचिवपदावरून नगरविकासमंत्री नाराज 
महापालिका प्रशासनाकडून अधिकाऱ्यांच्या जबाबदारीमध्ये फेरबदल करताना पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले नसल्याची माहिती मिळाल्यानंतर नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे संतापल्याची चर्चा आहे. यापूर्वी त्यांनी वारंवार महापालिका प्रशासनाच्या वतीने आपली भूमिका मांडलेली आहे; पण या वेळी पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी विश्वासात न घेता बदल्या करण्यात आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यातही सचिवपदाच्या बदलीमुळे सत्ताधारी पदाधिकारी जास्त नाराज आहेत. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेचा कारभार करताना तेथे वादग्रस्त प्रस्ताव आणण्यासाठी प्रसिद्ध असलेले मनीष जोशी यांना आणण्यात आल्याने तसेच शहरासमोर सर्वांत महत्त्वाच्या असलेल्या घनकचरा व्यवस्थापन विभागाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आल्याने प्रामुख्याने ही नाराजी व्यक्त होत असल्याचे कळते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Thane Municipality, the ruling, administration face to face