ठाण्यात बॅंक लुटीचा प्रयत्न फसला

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 जुलै 2017

झारखंडमधील आठ जणांची टोळी अटकेत

झारखंडमधील आठ जणांची टोळी अटकेत
ठाणे - बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या घोडबंदर रस्त्यावरील शाखेच्या भिंतीला भगदाड पाडून लूट करण्याचा प्रयत्न पोलिसांच्या दक्षतेमुळे फसला. ठाणे पोलिसांनी पाळत ठेवून झारखंडमधील आठ जणांच्या आंतरराज्य टोळीला अटक केली असून, त्यांना आसरा देणाऱ्या दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या टोळीने देशभरातील सोने तारण ठेवणाऱ्या कंपन्या व खासगी वित्तीय संस्थांमध्ये लूट केल्याची शक्‍यता आहे, अशी माहिती अपर पोलिस आयुक्त मकरंद रानडे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत लूट करण्यासाठी टोळीने बॅंकेलगत असलेल्या राज मोटर ड्रायव्हिंग स्कूलच्या सामूहिक भिंतीला भगदाड पाडले होते. ठाणे गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक अमोल वालझाडे यांना दरोड्याची कुणकुण लागल्याने गुन्हे शाखेची चार पथके टोळीच्या मागावर होती. शुक्रवारी (ता.21) मध्यरात्री बॅंकेशेजारील ड्रायव्हिंग स्कूलचे शटर उचकटून बॅंकेच्या भिंतीला भगदाड पाडीत असतानाच मुख्य सूत्रधार साकीम शेख याच्यासह आठ जणांना अटक केली. झारखंडमधील साहेबगंज जिल्ह्यातील रहिवासी असलेले सर्व आरोपी दिवसा मोलमजुरी करीत; तर रात्री दरोडे टाकत असत.

Web Title: thane news bank loot plan fail