परीक्षा तोंडाशी; पुस्तक नाही हाताशी

शर्मिला वाळुंज
सोमवार, 24 जुलै 2017

ठाणे - शाळा सुरू होऊन महिना उलटला तरी कल्याण-डोंबिवलीतील अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांना सरकारकडून पुस्तकेच न मिळाल्याने अवघ्या पंधरा दिवसांवर चाचणी परीक्षा आली असून, पेपरमध्ये नेमके काय लिहायचे, असा प्रश्‍न येथील विद्यार्थ्यांना पडला आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू होत असून, अद्याप मुलांच्या हातात पुस्तके नसल्याने पालक आणि शिक्षकांतही गोंधळाचे वातावरण आहे. दुसरीकडे दुकानांतही पुस्तके  नसल्याने विद्यार्थ्यांची इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था झाली आहे.

ठाणे - शाळा सुरू होऊन महिना उलटला तरी कल्याण-डोंबिवलीतील अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांना सरकारकडून पुस्तकेच न मिळाल्याने अवघ्या पंधरा दिवसांवर चाचणी परीक्षा आली असून, पेपरमध्ये नेमके काय लिहायचे, असा प्रश्‍न येथील विद्यार्थ्यांना पडला आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू होत असून, अद्याप मुलांच्या हातात पुस्तके नसल्याने पालक आणि शिक्षकांतही गोंधळाचे वातावरण आहे. दुसरीकडे दुकानांतही पुस्तके  नसल्याने विद्यार्थ्यांची इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था झाली आहे. सरकारकडूनच पुस्तकांचा कमी पुरवठा झाल्याचे शाळांचे म्हणणे असून, उर्वरित पुस्तकांची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.

कल्याण-डोंबिवली २०० ते २२५ शाळा असून, यातील ५० टक्‍क्‍यांहून अधिक विद्यार्थी पुस्तकांपासून वंचित आहेत.

राज्य सरकारकडून सर्व शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सर्व विषयांची पुस्तके मोफत देण्यात येतात. सरकारतर्फे महापालिका केंद्रावरून शाळांना पुस्तके देऊन ती मुलांपर्यंत पोहचवली जातात. दर वर्षी अत्यंत व्यवस्थित पार पडणाऱ्या या प्रक्रियेत यंदा पहिल्यांदाच मोठी अडचण निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांची संख्या आणि मिळालेली पुस्तके यात मोठी तफावत आहे. शाळा सुरू होऊन दीड महिना उलटला असून, शिक्षकांनी अभ्यासक्रम शिकवण्यासही सुरुवात केली आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात विद्यार्थ्यांची पहिली चाचणी परीक्षा आहे; मात्र अजूनही विद्यार्थ्यांना पुस्तके मिळालेली नाहीत. तिसरी, चौथी आणि पाचवीच्या विद्यार्थ्यांना मुख्यत्वे इतिहास, भूगोल, गणित, विज्ञान या विषयांची, तर सेमी इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना पर्यावरण या विषयाचे पुस्तक मिळालेले नाही. यंदा नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना तर कोणत्याच विषयाची पुस्तके मिळाली नसल्याचे समोर आले आहे. कल्याण पूर्वेतील गणेश विद्यामंदिर शाळेमध्येही केवळ २० ते २५ विद्यार्थ्यांना पुस्तके मिळालेली नाहीत; मात्र मागणी केली असून, लवकरच मुलांना पुस्तके मिळतील, असे शाळा प्रशासनाने सांगितले.

शाळांना मागणीनुसार पुस्तकांचे वाटप करण्यात आले आहे; मात्र नवीन प्रवेश घेतलेल्या मुलांना पुस्तके मिळालेली नाहीत. ज्या समूह साधन केंद्रात पुस्तके शिल्लक आहेत, ती एकत्र आणून त्यानंतर पुरवठा केला जाईल.
- कामिनी पाटील, प्रभारी शिक्षक, समूह साधन केंद्र

सरकारकडून विद्यार्थ्यांना पुस्तके मिळत असल्याने विक्रेते पहिली ते आठवीच्या पुस्तकांचा जास्त साठा ठेवत नाहीत. 
- मयूरेश गद्रे, पुस्तक विक्रेते

सरकारला आदल्या वर्षीच विद्यार्थ्यांची पटसंख्या कळविली जाते. त्यानुसार शाळांना पुस्तकांचा पुरवठा केला जातो. यंदा नवीन प्रवेश घेतलेल्या मुलांना पुस्तके मिळाली नाहीत. त्यासाठी मागणी केली आहे. 
- लीना ओक मॅथ्यू, पर्यवेक्षिका, टिळकनगर विद्यामंदिर, डोंबिवली

५० टक्‍क्‍यांहून अधिक विद्यार्थ्यांना पुस्तके मिळालेली नाहीत. एका वर्गात ३०० च्या आसपास विद्यार्थी आहेत; मात्र २२ ते २३ विद्यार्थ्यांना पुस्तके मिळालेली आहेत. पुस्तकांची मागणी प्रशासनाकडे केली आहे. 
- पुष्पा दास, ग्रंथपाल, सुभेदारवाडा शाळा, कल्याण

Web Title: thane news book education