फराळ तयार आहे; ऑर्डर स्वीकारल्या जातील!

शर्मिला वाळुंज
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

ठाणे - दिवाळी म्हटले, की सर्वात आधी आठवतो तो खमंग फराळ. चिवडा, लाडू, चकली, करंज्या, शंकरपाळ्या, अनारसे आणि बरेच काही... दिवाळीच्या दिवसांत प्रत्येक पदार्थ आवडीने केला आणि खाल्लाही जातोच. सध्या काही नोकरदार महिलांकडून मात्र तयार फराळालाच पसंती दिली जाते. त्यांची गरज ओळखून बाजारात मोठ्या प्रमाणावर तयार फराळ विकला जातो. दिवाळी आठवड्यावर आल्याने फराळाचे पदार्थ दुकानात तयार झाले असून ‘फराळ तयार आहे... ऑर्डर स्वीकारल्या जातील’ असे फलकही लागले आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या किमतीत फार बदल झाला नसून गेल्या वर्षीच्या दरातच ग्राहकांना तो मिळणार असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.

दर वर्षीप्रमाणे यंदाही तयार फराळाला मोठी मागणी आहे. दुकानांतही रेडिमेड फराळ दाखल झाला असून महिला बचत गट, पारंपरिक महिला व्यावसायिक, महिला मंडळे, खाद्यपदार्थांचे व्यावसायिक आणि उपाहारगृहांकडून तो तयार केला जात आहे. दिवाळीपूर्वी १५ दिवस आधीच तयारी करून फराळाचे पदार्थ तयार करण्यास सुरुवात केली जाते, असे विक्रेत्यांनी सांगितले. चकली, कडबोळी, शेव आदी पदार्थांच्या किमतीत मात्र ५ ते १० टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. महागाई, नोटाबंदी व जीएसटीमुळे मोठा फटका बसत असला, तरी ग्राहक सुटू नये म्हणून किमतीत जास्त वाढ न करण्याचे ठरवले आहे, असे श्रीसमर्थ गृह उद्योगचे प्रवीण रेमाणे यांनी सांगितले. अनेक कुटुंबातील मुले परदेशात वास्तव्यास असल्याने तिथे फराळ पाठवला जातो,  शनिवारी (ता. ७) पहिले पार्सल परदेशात रवानाही झाले, अशी माहिती ‘सुरस फूड्‌स’चे सुनील शेवडे यांनी दिली. परदेशात कोठेही फराळ पाठवले, तरी त्यांचे दर सारखे ठेवून विक्रेत्यांनी ग्राहकांना दिलासा दिला आहे. सहा किलोसाठी सात हजार आणि आठ किलोसाठी आठ हजार रुपये असा दर आहे.

बेक फराळालाही मागणी
गेल्या काही वर्षांपासून बेक फराळाची मागणी जोर धरू लागली आहे. अर्थात अजूनही पारंपरिक फराळाच्या तुलनेत त्याचे प्रमाण कमीच आहे, असे धनलक्ष्मी महिला बचत गटाच्या संजीवनी पाटील यांनी सांगितले. बेक फराळ बनवणे नेहमीचा फराळ बनवण्यापेक्षा जिकिरीचे असते. बेक फराळामुळे शरीरातील कॅलरी वाढत नाहीत. हे पदार्थ तेला-तुपात तळण्याऐवजी भाजले जातात. आहाराबाबत अधिक जागरूकता येत चालल्याने बेक फराळालाही मागणी वाढू लागल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: thane news diwali festival food