ठाण्यात भररस्त्यात मंडप

श्रीकांत सावंत 
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

ठाणे - अर्ध्याहून अधिक रस्ते व्यापलेले मंडप, रस्त्यावर खड्डे खणून बांधलेल्या कमानी, तीन फुटांपेक्षाही उंच मंडपांचे अवाढव्य आकार, बसथांब्याच्या समोरच मंडपाचा थाट उभारण्याचे काम ठाण्यात जोरात सुरू आहे. न्यायालयाच्या आदेशांची आणि महापालिकेच्या नियमांची पायमल्ली करून गणेशोत्सवासाठी मंडप उभारले जात असून, राजकीय पक्षाच्या नेत्यांचा यात मोठा सहभाग आहे. ठाण्यातील नौपाडा, पाचपाखाडी, किसननगर, वागळे इस्टेट, वर्तकनगर, इंदिरानगर, घोडबंदर रस्ता, घेवरा सर्कल यासह शहराच्या विविध भागांमध्ये मंडपाकडून अतिक्रमणे सुरूच असून, महिनाभर शहरवासीयांना कोंडीचा सामना करावा लागणार आहे.

ठाणे - अर्ध्याहून अधिक रस्ते व्यापलेले मंडप, रस्त्यावर खड्डे खणून बांधलेल्या कमानी, तीन फुटांपेक्षाही उंच मंडपांचे अवाढव्य आकार, बसथांब्याच्या समोरच मंडपाचा थाट उभारण्याचे काम ठाण्यात जोरात सुरू आहे. न्यायालयाच्या आदेशांची आणि महापालिकेच्या नियमांची पायमल्ली करून गणेशोत्सवासाठी मंडप उभारले जात असून, राजकीय पक्षाच्या नेत्यांचा यात मोठा सहभाग आहे. ठाण्यातील नौपाडा, पाचपाखाडी, किसननगर, वागळे इस्टेट, वर्तकनगर, इंदिरानगर, घोडबंदर रस्ता, घेवरा सर्कल यासह शहराच्या विविध भागांमध्ये मंडपाकडून अतिक्रमणे सुरूच असून, महिनाभर शहरवासीयांना कोंडीचा सामना करावा लागणार आहे. याविषयी महापालिका प्रशासन आणि पोलिस प्रशासन नेमकी काय कारवाई करते, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. ठाणेकरांना या मंडपाचा त्रास होत असल्यास ठाणे महापालिकेकडे याप्रकरणी तक्रार करता येणार आहे. 

गणेशोत्सव आठ दिवसांवर आल्यामुळे ठाणे शहरात मंडळाची घाई उडाली आहे. मंडप उभारताना कायदा, नियमावलीस बगल देण्यात आली आहे. गणेशोत्सवापूर्वीच मंडप परिसरात वाहतूक कोंडी सुरू झाली आहे. ठाणे रेल्वेस्थानक परिसरातील मोकळ्या जागेवर गणेशोत्सवासाठी मंडपाची उभारणी सुरू असून, येथे प्रवाशांना अडथळा होईल अशा अवस्थेत दोन दिवसांपासून काम सुरू आहे. गणेशोत्सव सुरू झाल्यानंतर येथील अडथळा आणि ध्वनिप्रदूषणाचा त्रास नागरिकांना होण्याची शक्‍यता आहे. ठाण्यातील पाचपाखाडी परिसरातही भव्य स्वरूपाचा मंडप उभारण्यात आला असून, या मंडपाने अर्ध्याहून अधिक रस्ता अडवला आहे. हा मंडप ३० फुटांपेक्षाही उंच असून त्यासाठी महापालिकेची विशेष परवानगी घेणे गरजेचे आहे. दर वर्षी घेवरा सर्कल येथे भव्यदिव्य मंडप उभारून येथील बसथांब्याची अडवणूक करणारा येथील मंडप यंदा काहीसा लहान झाला आहे. यंदा त्यांनी बसथांबा झाकला नसला तरी बसथांब्यापासून अवघ्या काही अंतरावरच हा मंडप असल्यामुळे बस थांबण्यासाठी मात्र जागा नाही. किसननगर येथील गणेशोत्सवाच्या मंडपाने तर पूर्ण रस्ता व्यापला आहे. चंदनवाडी येथील मंडपानेही एक तृतीयांश रस्ता अडवला असून, त्याचीही उंची मोठी आहे.

ठाणे पालिकेची नियमावली
१) रेल्वेस्थानक, बसस्थानक, रिक्षा, टॅक्‍सी थांबे, रुग्णालय, शैक्षणिक संस्था परिसरात परवानगी देताना विशेष लक्ष द्यावे.
२) पोलिस आयुक्तांच्या सहमतीनंतरच पालिका प्रशासनाने मंडपास परवानगी देणे कायदेशीर ठरेल.
३) वाहतूक पोलिस आणि शहर पोलिसांनी ना हरकत प्रमाणपत्र परवानगी देताना तपासणी आवश्‍यक.
४) उत्सवाच्या ३० दिवस आधी प्रभाग समितीच्या सहायक आयुक्तांकडे परवानगीसाठी अर्ज करावेत.
५) मंडपाच्या दर्शनी भागात नकाशा, मंडपाची लांबी, रुंदी आणि आराखडा लावून तो पालिकेकडे सादर करावा.
६) मंडप परिसरात दिशादर्शक, वाहतूक बदलाच्या सूचना मंडळाने लावाव्यात.
७) ३० फुटांपेक्षा जास्त उंचीचा मंडप उभारण्यास बंदी असून, २५ फुटांपेक्षा उंच मंडपासाठी रचना स्थिरता प्रमाणपत्र (स्ट्रक्‍चर स्टॅबिलिटी सर्टिफिकेट) बंधनकारक आहे.
८) रस्त्यावर खड्डे खणून मंडप उभारल्यास प्रती खड्डा दोन हजार रुपयांचा दंड होऊ शकतो.
९) सिमेंट काँक्रीटचा रस्ता खणण्यास पूर्णपणे मनाई आहे.
१०) मंडपात जाहिरात करण्यास बंदी असून जाहिरात फलकासाठी १२५ रुपयाचे, तर १०० मीटर परिसरात १०१ रुपये शुल्क आकारण्यात येईल.
११) मंडपामध्ये स्टॉल उभारण्यास बंदी आहे.

मंडप उभारणीसह फलकांसाठी खड्डे
गणेशोत्सवाचे मंडप उभारण्यासाठी ठिकठिकाणी रस्ते खणले आहेत. केवळ डांबरी रस्तेच नव्हे तर सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांच्या बाजूच्या जागाही खोदण्यात आल्या आहेत. याप्रकरणी मंडळांना प्रत्येक खड्ड्यासाठी दोन हजार रुपयांपर्यंत दंड होण्याची शक्‍यता असतानाही या दंडाची भीती न बाळगता शहरामध्ये शेकडो खड्डे खणण्यात आले आहेत. मंडपाशिवाय रस्त्यांवरील जाहिरातींची भलीमोठी भिंत उभी करण्यासाठीही खड्डे खणण्यात आले आहेत. याबाबत नागरिक महापालिका प्रशासनाकडे तक्रार करू शकणार आहेत. तक्रारींवर कारवाई करणे पालिका प्रशासनाला बंधनकारक आहे. ध्वनिप्रदूषण आणि वाहतूकविषयक तक्रारी करण्यासाठी महापालिकेने १८००२२२१०८ हा हेल्पलाईन क्रमांक दिला आहे. rdmc@thanecity.gov.in या ई-मेलवर, ७५०६९४६१५५ या क्रमांकावर एसएमएसद्वारे तक्रार करता येणार आहे.

Web Title: thane news mandap ganeshotsav