झोपमोड झाल्याने विद्यार्थ्यांना मारहाण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018

ठाणे - नृत्याचा सराव करताना आवाज झाल्याने झोपमोड झाली म्हणून ठाण्यातील एका शाळेच्या संस्थाचालिकेने सुमारे 18 मुलांना फायबरच्या बांबूने मारहाण केल्याची धक्‍कादायक घटना बुधवारी (ता.14) घडली. या प्रकरणी गौतम हिंदी-इंग्रजी कनिष्ठ महाविद्यालयाच्या संचालकांविरोधात ठाणे नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम गुरुवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होते. मारहाण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये 13 मुली व पाच मुलांचा समावेश आहे. या घटनेत अर्ची जैन, ग्रेसी क्विलो, असद मुलाणी यांच्यासह अन्य जखमी विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत.

ठाण्यातील हिंदू मिशन एज्युकेशन सोसायटीच्या गौतम प्राथमिक माध्यमिक हिंदी-इंग्रजी कनिष्ठ महाविद्यालयात काल सायंकाळी पाचवी ते दहावीमधील 18 विद्यार्थी हे स्नेहसंमेलनासाठी नृत्याचा सराव करत होते. या वेळी वर्गातील बाक हलविताना आवाज झाला. त्यामुळे पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या विश्‍वस्त शिल्पा यांची झोपमोड झाली. त्यांनी शिक्षकांना सूचना देऊन विद्यार्थ्यांना खाली बोलावून घेतले. त्यांनी काही विद्यार्थ्यांचे डोके घरातील सामानावर आदळले. त्यानंतर त्यांनी फायबरचा पाइप हातात घेत मुलांना मारहाण केली.

Web Title: thane news mumbai news student beating crime