रिमोटवरील अँथेना चीपद्वारे नागपुरच्या पेट्रोलपंपावर इंधनचोरी

दीपक शेलार
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

पोलिसांच्या छाप्यात याठिकाणी आधुनिक असे अँथेना पल्सर कार्ड पोलिसांना आढळले. विशेष म्हणजे, हे कार्ड रिमोटच्या साह्याने सुरु होते. तेव्हा, येथील मोठा घोटाळा उघड होण्याची शक्यता ठाणे गुन्हे शाखेचे उपायुक्त अभिषेख त्रिमुखे यांनी वर्तवली. त्यानुसार,अशाप्रकारचे अँथेना कार्ड बनवणाऱ्यापर्यंत पोलिस लवकरच पोहोचणार असून त्यासाठी विशेष पथक कार्यरत असल्याच्या माहितीला वरिष्ठ अधिकाऱ्यानी दुजोरा दिला.

ठाणे : ठाणे पोलिसांकडून पेट्रोल पंपावरील धाडसत्र सुरूच आहे. नागपूर येथील दहेगाव कलमेश्वर रोडवरील इंडियन ऑईल कंपनीच्या पुष्पा मुंदडा यांच्या पेट्रोलपंपावर धाड टाकण्यात आली. या पंपात एक अनोखी नवीन पल्सर चीप आढळून आली असून या चीपच्या साह्याने लाखो ग्राहकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक सुरु असल्याचे आढळले.

पोलिसांनी येथून रिमोटवर चालणारे 'अँथेना' पल्सर कार्ड हस्तगत करून मोठी कारवाई केली आहे. त्यामुळे,पेट्रोलपंपावरील इंधनचोरीचे लोण आता थेट मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात पोहचले आहे.

ठाणे पोलिसांनी जून महिन्यात पेट्रोलपंपात फेरफार करून इंधनचोरी करणाऱ्या पंपचालकांवर सुरू केलेल्या कारवाईत आतापर्यंत राज्यातील 161 पेट्रोलपंपांवर छापे टाकले आहेत. त्यापैकी 82 पंप दोषी आढळले. आता ठाणे पोलिसांनी नागपुरातील टाकलेल्या या छाप्यात गील्बर्गो कंपनीच्या दोन नोझलमध्ये फेरफार आढळल्याने पोलिसांनी दोन पल्सर, दोन की-पॅड आणि एक मदरबोर्ड जप्त केला. याच पंपावरील मिड्को कंपनीचे दोन नोझल बंद असल्याची तक्रार पंपमालकाने कंपनीकडे केल्याने येथे फेरफार असण्याची शक्यता ठाणे गुन्हे शाखेने वर्तवली आहे. यासोबत टोकियम कंपनीच्या आठ नोझलमध्ये फेरफार आढळल्याने आठही ठिकाणचे पल्सर कार्ड पोलिसांनी जप्त केले.

पोलिसांच्या छाप्यात याठिकाणी आधुनिक असे अँथेना पल्सर कार्ड पोलिसांना आढळले. विशेष म्हणजे, हे कार्ड रिमोटच्या साह्याने सुरु होते. तेव्हा, येथील मोठा घोटाळा उघड होण्याची शक्यता ठाणे गुन्हे शाखेचे उपायुक्त अभिषेख त्रिमुखे यांनी वर्तवली. त्यानुसार,अशाप्रकारचे अँथेना कार्ड बनवणाऱ्यापर्यंत पोलिस लवकरच पोहोचणार असून त्यासाठी विशेष पथक कार्यरत असल्याच्या माहितीला वरिष्ठ अधिकाऱ्यानी दुजोरा दिला.

ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पेट्रोलपंपप्रकरणी मुख्य आरोपी प्रकाश नुलकर याला अटक केली.या प्रकरणात आतापर्यंत 23 जणांना अटक करण्यात आली असून,त्यापैकी काहींना न्यायालयीन कोठडी मिळाली.तर,इंधनचोरी होत असलेल्या पंपांमधून पोलिसांनी हस्तगत केलेल्या 262 पल्सर,20 सेन्सर कार्ड,111 कंट्रोल कार्ड,100 की-पॅडची तपासणी सुरु केली आहे.

Web Title: Thane news petrol thief racket thane police