नागरिकांना सतर्कतेचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 जून 2017

मुसळधार पावसाच्या शक्‍यतेने पालिकेचे आपत्कालीन पथक सज्ज असून सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पालिका क्षेत्रात आरोग्य प्रश्‍न भेडसावू नये, म्हणून पालिकेच्या रुग्णालयात मुबलक औषधसाठा उपलब्ध असून स्वाइन फ्लूचे वाढते रुग्ण पाहता त्या आजाराचे औषध पालिकेच्या रुग्णालयात मोफत ठेवण्यात आले आहे.
- संजय घरत, अतिरिक्त आयुक्त, पालिका 

कल्याण - हवामान खात्याच्या अंदाजानुसार ठाणे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी येत्या १२० तासांत जोरदार पाऊस होण्याची शक्‍यता वर्तविली असून सर्व पालिका आणि तहसीलदार कार्यालयांनी अतिदक्षता घ्यावी, असे आदेश दिले आहेत. त्यानुसार कल्याण-डोंबिवली महापालिका परिसरातील नागरिकांना पालिकेने सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

कल्याण-डोंबिवली महापालिका परिसरात १० प्रभाग क्षेत्र कार्यालये असून १२२ वॉर्ड आहेत. यात सरासरी १५ लाख १८ हजार ७६२ नागरिक राहतात. १ जून ते २८ जून २०१७ पर्यंत पालिका परिसरात ५२९ मि.मी. पाऊस झाला असून मागील २४ तासांत १०० मिमी पाऊस पडला आहे. सलग दोन ते तीन दिवस पाऊस सुरू असल्याने शहरातील सखल भागात आणि प्रमुख रस्त्यांवर पाणी साचले आहे. 

कल्याणमधील विंदवाडी, बेतुरकर पाडा, शिवाजी चौक, स्थानक परिसर, घोलपनगर, परिवहन डेपो, मिलिंदनगर, बैल बाजार, अशोकनगर, वालधुनी, स्वानंदनगर, खडेगोलवली, कोळसेवाडी, विठ्ठलवाडी, कल्याण पूर्व स्थानक परिसर, सिद्धार्थनगर, पावशेनगर, कैलासनगर, डोंबिवलीतील ठाकूरवाडी, रेतीबंदर रोड, जयहिंद कॉलनी, विकास सोसायटी, गांधीनगर, संत नामदेव पथ, उर्सेकर वाडी, डोंबिवली रेल्वे स्थानक परिसर, जुनी डोंबिवली, जलारामनगर आदी परिसरातील नागरिकांना पालिकेने सतर्कतेचे आवाहन केले आहे. पालिकेचे आपत्कालीन व्यवस्थापन खातेप्रमुख अनिल लाड यांनी अधिकाऱ्यांनाही आपत्कालीन परिस्थितीत तक्रारी त्वरित मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

Web Title: thane news rain kdmc