चर्चेला शिवसेनेची बगल 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 जून 2017

ठाणे - पावसाळा सुरू झाल्यानंतरही शहरातील अनेक नाले कचरा आणि गाळाने भरून वाहत असतानाही पालिका प्रशासन नालेसफाई झाल्याचा दावा करून आपलीच पाठ थोपटून घेत आहे. पालिकेत मंगळवारच्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादी कॉंग्रेस नालेसफाईवर लक्षवेधी मांडून या दाव्याची पोलखोल करणार होती; पण शिवसेनेने या विषयाला बगल देऊन नालेसफाईसाठी विशेष सर्वसाधारण सभा बोलावण्याचा विचार असल्याचे सांगितले. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने नगरसेवक नजीब मुल्ला आणि शानू पठाण यांनी नालेसफाईच्या कामाबाबतची लक्षवेधी मांडली होती. विशेष म्हणजे, सर्वसाधारण सभेच्या बाहेर फलक फडकावत पठाण यांनी मुंब्य्रात नालेसफाई झाली नसल्याचा दावा केला होता. त्यामुळे या विषयावर किमान सभागृहात चर्चा होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत होती; पण नालेसफाईच्या लक्षवेधीवरून केवळ प्रशासनच नाही तर सत्ताधारी शिवसेनेलाही लक्ष्य करण्याची व्यूहरचना विरोधकांनी आखली होती. मुळात प्रशासनाने दावा केल्यानंतरही अनेक नाल्यांतील गाळ कायम असल्याचे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने आंदोलन केले. त्यानंतरही प्रशासनाला जाग आलेली नाही. विशेष म्हणजे, घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांना सत्ताधारी शिवसेनेचे पालिकेतील पदाधिकारी पाठीशी घालत असल्याचे चित्र आहे. यावरून प्रशासनाबरोबरच नालसफाईमध्ये सत्ताधारी शिवसेनेचीही कोंडी होणार आहे. त्यामुळेच नालेसफाईच्या विषयावर विशेष सभा बोलावण्याचे आदेश महापौर मीनाक्षी शिंदे यांनी दिले. सध्या सत्ताधारी आपल्या बहुमताच्या जोरावर अनेक विषय रेटत आहे. विषय फार न ताणता विरोधी पक्षनेते नेते मिलिंद पाटील यांनी विशेष सभेसाठी अनुमती दिली. 

सभेबाबत गूढ 
विशेष सभा कधी होणार, याबाबत कोणतीही घोषणा न झाल्याने या नालेसफाईच्या विशेष सभेबाबत गूढ कायम आहे. अशा वेळी सत्ताधारी शिवसेनेकडून नालेसफाईच्या विशेष सभेबाबत चालढकल झाल्यास विरोधी पक्ष या विषयावर आक्रमक होऊन सभा बोलाविण्याचा आग्रह धरणार असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या एका नगरसेवकाने दिली.

Web Title: thane news shiv sena