पालिकेने तोडले पाणी, वीज 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जानेवारी 2018

ठाणे - हॉटेल चालक अथवा लाऊंज चालविणाऱ्या बारवाल्यांना ठाणे महापालिकेकडून कारवाई करण्यापूर्वी 15 दिवसांची नोटीस बजावली जाते; मात्र दुसरीकडे एसआरए प्रकल्पातून उभ्या राहिलेल्या गृहसंकुलातील नागरिकांना कोणत्याही प्रकारची नोटीस न बजावता त्यांचे पाणी आणि वीज कनेक्‍शन तोडण्यात आले आहे. त्याचा फटका तब्बल तीन हजार नागरिकांना बसला असून त्यांच्यावर 24 तास पाणी आणि विजेविना राहण्याची वेळ आली आहे. येथील नागरिक महापालिकेच्या या कारवाईने हतबल झाले असून आता याबाबत नक्की दाद कुठे मागायची, या विवंचनेत ते अडकले आहेत. 

ठाण्याच्या कामगार रुग्णालय परिसरात झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत श्री जिजामाता नगर सहकारी गृहनिर्माण सोसायटी ही 19 मजल्यांची इमारत बांधण्यात आली आहे. या इमारतीत सुमारे तीन हजार नागरिक राहतात. यात वयोवृद्ध नागरिक, अपंग व्यक्ती तसेच गर्भवतीही राहत आहेत. या इमारतीत सोमवारी सकाळी ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी तसेच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण विभागाचे पथक पाण्याचे कनेक्‍शन आणि वीज जोडणी तोडण्यासाठी दाखल झाले होते. महत्वाचे म्हणजे यापूर्वी या दोन्ही विभागांनी या इमारतीतील नागरिकांना कोणत्याही प्रकारची नोटीस बजावलेली नव्हती. कोणत्याही प्रकारची नोटीस न देता या इमारतीचे पाणी आणि विद्युत जोडणी खंडित करण्यात आली आहे. 

सोसायटीच्या म्हणण्यानुसार या इमारतीच्या आवारात न्यायालयीन विषयामुळे तीन बांधकामे आहेत. ती हटविण्यात न आल्याने या सोसायटीला अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळाले नाही. येथील ही बांधकामे हटविण्यात यावी, यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन कार्यालय आणि संबधित विभागाशी विकासकाने पत्रव्यवहार केला आहे; पण ही बांधकामे हटविण्यात आलेली नाहीत. त्याचा फटका हजारो नागरिकांना बसत असून महापालिकेने येथील नागरिकांचा माणुसकीच्या दृष्टीकोनातून विचार करावा, अशी मागणी केली आहे. 

पत्राद्वारे 15 दिवसांच्या मुदतीची मागणी 
श्री जिजामाता नगर सहकारी गृहनिर्माण सोसायटीतर्फे ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांना पत्र पाठवून मानवतेच्या दृष्टिकोनातून 15 दिवसांची मुदत देण्यात यावी, अशी विंनती करण्यात आली आहे. याच आशयाचे पत्र महाराष्ट्र विद्युत वितरण विभागाला देण्यात आले आहे. याबाबत बोलताना येथील रहिवासी कैलास देशमुख म्हणाले, ठाणे महापालिका बार आणि लाऊंज यांच्यावर कारवाई करण्यापूर्वी 15 दिवसांची नोटीस देते; पण सर्वसामान्य नागरिकांना कोणत्याही प्रकारची नोटीस न देता कारवाई करते. माणुसकीच्या दृष्टीने आमचा विचार करून आम्हांला मुदत द्यावी, अशी आमची विनंती आहे.

Web Title: thane news TMC water electricity