ठाणे जिल्ह्यात 5 लाख 56 हजार वृक्षारोपण; पावसामध्येही उत्साही सहभाग

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 जुलै 2017

ठाणे कारागृहात वृक्षारोपण :
राज्यभर वृक्षारोपण मोहिम राबवली जात असताना ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहाच्या परिसरामध्येही वृक्षारोपण करण्यात आले. कृषी दिनानिमित्त राज्याचे गृह(तुरूंग) विभागाचे सचिव श्रीकांत सिंह यांच्या हस्ते ठाणे मध्यवतीं कारागृहाच्या बाहेरील परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. तसेच कारागृहातील कारखाना, बेकरी, शिवणकाम व महिला विभाग इत्यादी विभागास भेट देऊन कारागृहाची पाहणी केली. 

ठाणे : महाराष्ट्राच्या वन विभागाच्या वतीने चार कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प यंदाच्या वन महोत्सवाच्या निमित्ताने घेतला असून त्यापैकी ठाणे जिल्ह्याच्या वतीने सुमारे 16 ते 17 लाख झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे. शनिवारी 1 जुलै रोजी या उपक्रमाची सुरूवात ऐरोली येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाल्यानंतर जिल्ह्यामध्ये दोन दिवसांमध्ये सुमारे 5 लाख 56 हजार वृक्षांचे रोपण करण्यात आले आहे. वनविभाग आणि इतर सर्व विभाग यांनी मिळून हे वृक्षारोपण केले आहे. जिल्ह्याला यंदा 10 लाख 1 हजार रोपांचे उद्दिष्ट्य दिले असले तरी 16 लाख 41 हजार रोपे लावण्यासाठी तयारी पुर्ण झाल्याचे वन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. जिल्ह्यामध्ये 18 लाखांपर्यंत वृक्ष लागवड होऊ शकते असा विश्वास जिल्हाधिकारी डाॅ. महेंद्र कल्याणकर यांनी व्यक्त केला. 

ठाणे जिल्हाधिकारी डाॅ. महेंद्र कल्याणकर यांनी रविवारी वृक्षारोपण मोहिमेचा आढावा घेतला व उद्दिष्ट पूर्ण करून जिल्ह्याची कामगिरी उत्तम करण्याच्या सुचना दिल्या. सध्या 15 लाखापेक्षा जास्त खड्डे तयार आहेत. रविवारी वन विभागाने 4 लाख 37 हजार 431 रोपे लावली असे उप मुख्य वन संरक्षक डॉ जितेंद्र रामगावकर यांनी सांगितले. सामाजिक वनीकरणने 16 हजार 865 रोपे तर महानगरपालिका व नगर परिषदांनी मिळून 85 हजार 302 रोपे लावली. महसूल, कृषी विभाग व इतरांनी मिळून 9 हजार, उद्योग, पोलीस यांनी मिळून 100 अशी रोपे लावण्यात आली. ग्रामपंचायतीनी मिळून 1 लाख 31 हजार 40 इतकी रोपे लावली. मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भिमनवार, कृषी अधिकारी डॉ प्रफुल्ल बनसोडे यांनी यासंदर्भात ग्रामपंचायतीच्या यंत्रणेला आठवड्याभरात उद्दिष्टपेक्षा जास्त रोपे लावण्याच्या सुचना दिल्या आहेत. ठाण्यातील कळवा येथील जैवविवधता उद्यानामध्ये आमदार संजय केळकर आणि शहरातील नागरिकांच्या उपस्थितीमध्ये व्यापक प्रमाणामध्ये वृक्षारोपण करण्यात आला. यावेळी शहरातील नागरिक, शाळकरी विद्यार्थी, वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी वृक्षांची दिंडी काढून वृक्षारोपणाचा संदेश देण्यात आला. त्यानंतर याभागात वृक्षारोपण करण्यात आले. एकाचवेळी जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये वृक्षारोपणाचे कार्यक्रम सुरू असून नागरिकांनी त्यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन वन विभागाच्यावतीने करण्यात आला. 

बाल स्नेहालय अनाथाश्रमात वृक्षारोपण :  
ठाण्यातील वर्तकनगर भागातील बाल स्नेहालय अनाथाश्रमामध्येही वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक प्रदीप गिरिधर आणि पोलिस कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी यावेळी वृक्षारोपण कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन वृक्षारोपण केले. पिंपळ, कडुनिंब अशा 10 झाडांचे आश्रमातील लहान मुलांच्या हस्ते वृक्षारोपण करून घेण्यात आले. त्यानंतर मुलांना पोलिसांच्यावतीने अल्पोपहार देण्यात आला.  त्यावेळी आश्रमाच्या संचालिका पोटे उपस्थित होत्या. लहान मुलांच्या मनावर वृक्षारोपणचे महत्व कळावे तसेच वसुंधरा, वृक्ष आणि एकुणच निसर्गा विषयी आवड निर्माण व्हावी यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरिक्षक प्रदीप गिरिधर यांनी दिली. 

Web Title: thane news tree plantation rains monsoon