ठाणेकरांची स्मार्ट धाव!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

ठाणे  - ऊन, मधूनच कोसळणाऱ्या पावसाच्या श्रावणसरी, मॅरेथॉन जिंकण्याच्या जिद्दीने उतरलेले हजारो स्पर्धक आणि रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून त्यांना प्रोत्साहन देणारे असंख्य ठाणेकर असा नयनरम्य सोहळा २८ व्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेच्या निमित्ताने रविवारी ठाण्यात रंगला. ‘चला धावू या, स्मार्ट ठाण्यासाठी’ या संकल्पनेवर आधारित ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत १० गटांत २२ हजार स्पर्धकांनी सहभाग घेतला. जिल्ह्यातील आणि राज्यातील इतर भागांतून आलेल्या स्पर्धकांची उपस्थितीही लक्षणीय होती.

ठाणे  - ऊन, मधूनच कोसळणाऱ्या पावसाच्या श्रावणसरी, मॅरेथॉन जिंकण्याच्या जिद्दीने उतरलेले हजारो स्पर्धक आणि रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून त्यांना प्रोत्साहन देणारे असंख्य ठाणेकर असा नयनरम्य सोहळा २८ व्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेच्या निमित्ताने रविवारी ठाण्यात रंगला. ‘चला धावू या, स्मार्ट ठाण्यासाठी’ या संकल्पनेवर आधारित ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत १० गटांत २२ हजार स्पर्धकांनी सहभाग घेतला. जिल्ह्यातील आणि राज्यातील इतर भागांतून आलेल्या स्पर्धकांची उपस्थितीही लक्षणीय होती. सकाळी ६.३० वाजता राज्याचे सावर्जनिक बांधकाममंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांनी पुरुष आणि महिला गटाच्या स्पर्धेला झेंडा दाखवल्यानंतर टप्प्याटप्प्याने विविध गटांच्या स्पर्धा सुरू झाल्या. विविध ठिकाणी संपणाऱ्या स्पर्धांचे त्याच भागात बक्षीस वितरण झाले, तर मुख्य सोहळा ठाणे महापालिका मुख्यालयाच्या परिसरात पार पडला. 

शहरात २७ वर्षांपासून होणारी मॅरेथॉन राज्यातील सर्वांत जुनी मॅरेथॉन स्पर्धा म्हणून ओळखली जाते. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या खेळाडूंच्या सहभागामुळे वेगळ्या उंचीवर पोहोचलेल्या स्पर्धेत शहरातील आणि राज्यातील विविध भागांमधील धावपटूंचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. स्पर्धेसाठी शनिवारी सकाळपासूनच स्पर्धकांनी ठाणे शहर गाठले. रात्री उशिरा स्पर्धकांच्या नोंदणीचे काम पूर्ण झाले. ठाण्यातील शाळा, महाविद्यालय, महापालिका शाळा आणि आसपासच्या शहरांमधील विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवला. स्पर्धेसाठी मुंबई, नवी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, अलिबाग, गडचिरोली, सांगली, पालघर, रायगड, वाशिम, चंद्रपूर, अनगाव येथून मोठ्या संख्येने स्पर्धक खेळाडू उपस्थित होते. 

स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी राज्याचे सावर्जनिक बांधकाममंत्री (उपक्रम) आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे, ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार रवींद्र फाटक, उपमहापौर रमाकांत मढवी, सभागृह नेते नरेश म्हस्के, विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे, परिवहन समिती सभापती अनिल भोर, २०१९ च्या कॉमनवेल्थ स्पर्धेत कराटे या क्रीडा प्रकारामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारी आंतरराष्ट्रीय कराटेपटू संध्या शेट्टी आणि शरीरसौष्ठवपटू गिरीश शेट्टी आदी मान्यवर उपस्थित होते. पुरुष (२१ किमी), महिला (१५ किमी), पुरुष (१० किमी), १८ वर्षांखालील मुले (१० किमी), १५ वर्षांखालील मुले (५ किमी), १५ वर्षांखालील मुली (५ किमी), १२ वर्षांखालील मुले (३ किमी), १२ वर्षांखालील मुली (३ किमी), ज्येष्ठ नागरिक पुरुष (५०० मीटर) आणि ज्येष्ठ महिला (५०० मीटर) याशिवाय ‘रन फॉर फन’ या गटांचाही स्पर्धेत सहभाग होता. 

ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनमधील विजेते
२१ किमी (पुरुष गट)
प्रथम- रंजित सिंग, पुणे 
द्वितीय- पिंटू यादव, नाशिक 
तृतीय- सचिन गमरे, अलिबाग 

१५ किमी (महिला गट)
प्रथम- आरती पाटील, भोसला मिलिटरी स्कूल, नाशिक 
द्वितीय- वर्षा भवारी, मुंबई पोलिस
तृतीय- ज्योती चव्हाण, संग्राम प्रतिष्ठान, पुणे

१० किमी (पुरुष गट सर्वसाधारण)
प्रथम- ज्ञानेश्‍वर मोरगा, पालघर
द्वितीय- अमित माळी, पालघर
तृतीय- युवराज तेथले, पालघर

१० किमी (१८ वर्षांखालील मुले)
प्रथम- प्रकाश देशमुख, वाशिम
द्वितीय- दिनेश म्हात्रे, वनवासी कल्याण आश्रम
तृतीय- शिवाजी गोसावी, चंद्रपूर जिल्हा स्टेडियम

५ किमी (१५ वर्षांखालील मुले)
प्रथम- अक्षय सावंत, शारदा विद्यामंदिर, अनगाव 
द्वितीय- मनोज मगन, जय संतोषी माता, अनगाव
तृतीय- अशोक वारगुडे, एम. एच. विद्यालय 

५ किमी (१५ वर्षांखालील मुली)
प्रथम- अश्विनी मोरे, राजश्री शाहू, नवी मुंबई
द्वितीय- नेहा फुफाणे, शारदा विद्यामंदिर
तृतीय- किशोरी मोकाशी, 
शिवभक्त विद्यामंदिर, बदलापूर

३ किमी (१२ वर्षांखालील मुले)
प्रथम- संजय बिंद, गार्डियन हायस्कूल, डोंबिवली
द्वितीय- अमोल भोये, शारदा विद्यामंदिर, अनगाव
तृतीय- अनिल वैजल, शारदा विद्यामंदिर, अनगाव

३ किमी (१२ वर्षांखालील मुली)
प्रथम- परीना खिल्लारी, 
ऑक्‍सफर्ड इंग्लिश स्कूल, ठाणे 
द्वितीय- यज्ञिका दळवी, 
राजश्री छत्रपती शाहू महाराज विद्यालय, नवी मुंबई
तृतीय- पल्लवी झा, जिंदाल स्पोर्टस्‌, वाशिंद 

ज्येष्ठ नागरिक गट 
प्रथम- सतपाल सिंग, वाशिंद
द्वितीय- संभाजी डेरे,  दिवा
तृतीय- एकनाथ पाटील, कोनगाव 

ज्येष्ठ नागरिक महिला गट
प्रथम- नानकी निहलानी 
द्वितीय- सुनंदा देशपांडे
तृतीय- सुजाता हळबे

रन फॉर फन
प्रथम- कल्पेश राठोड
द्वितीय- प्रसाद तेंडूलकर
तृतीय- दत्तात्रेय उतेकर

Web Title: thane news varsha marathon